स्ट्रॉसबर्ग - निर्वासितांना सामावून घेण्यावरून युरोपियन संघटनेत दुफळी निर्माण होण्याची शक्यता संघटनेचे अध्यक्ष ज्याँ क्लॉद जंकर यांनी गुरूवारी व्यक्त केली. संघटनेत २८ देशांचा समावेश आहे. वास्तविक २०१२ साली युरोपमध्ये शांती, सदभाव आणि एकतेसाठी दिलेल्या योगदानाबद्दल संघटनेला नोबेल शांती पुरस्काराने गौरवण्यात आले होते.
जंकर यांनी आपल्या पहिल्या अध्यक्षीय भाषणात संघटनेत फूट दिसू लागली आहे, असे वक्तव्य करून अंतर्गत मतभेदाचे जाहीरपणे दर्शन घडवले. जंकर यांनी १ लाख ६० हजार निर्वासितांना वेगवेगळ्या देशांत सामावून घेण्याची योजना मांडली होती. परंतु त्यावर १४ सप्टेंबर रोजी अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. मात्र त्या अगोदरच अनेक देशांनी सामावून घेण्याबाबत असमर्थता दर्शवल्याने जंकर यांनी हा सूर आळवला.
डेन्मार्कने बंद केला जर्मनीचा मार्ग
डेन्मार्कने शेकडो निर्वासितांना सीमेवर रोखले आहे. त्याचबरोबर जर्मनीसोबतचा रेल्वे संपर्कही तोडला आहे. महामार्ग देखील बंद करून टाकला आहे. रेल्वेवर चढून जाण्यास मनाई केल्यामुळे निर्वासित पायीच निघाले आहेत. निर्वासितांना स्वीडनला पोहचायचे आहे.
स्वीडन पहिली पसंत सिरियातून येणाऱ्या निर्वासितांना आश्रय देण्यास सुरूवात केल्यानंतर स्वीडनच निर्वासितांची पहिली पसंत बनली आहे. त्यामुळे स्वीडनमध्ये निर्वासितांची संख्या वाढली आहे.
या देशांना बसला सर्वाधिक फटका
ग्रीस - २.१३ लाख निर्वासित
हंगेरी - १.४५ लाख निर्वासित
इटली - १.१५ लाख निर्वासित