रक्का - इस्लामिक स्टेटने पुन्हा एकदा अल्पवयीन मुलाच्या हातून हत्या घडवून आणल्याचा व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. आयएसने प्रसिद्ध केलेल्या या व्हिडिओमध्ये एक अल्पवयीन मुलगा कथितरित्या संघटनेची हेरगिरी करणाऱ्या व्यक्तीला गोळ्या मारताना दिसत आहे. या जिहादीचे वय 14 वर्षे आहे. त्याने 9MM च्या पिस्तूलाने हेरगिरी करणाऱ्याला गोळ्या घातल्याचे सांगण्यात आले.
पिस्टल स्वतः लोड केले
काळ्या रंगाच्या कपड्यांमधील अल्पवयीन मुलाच्या छातीवर आयएसआयएसचा लोगो दिसत आहे. तो मुलगा स्वतः पिस्टल लोड करतो आणि हेरगिरी करणाऱ्याला गोळी मारतो. एवढेच नाही तर, हत्येनंतर तो अमेरिका, रशिया आणि युरोपवर दहशतवादी हल्ले करण्याची धमकी देतो. मीडियामध्ये या मुलाला 'जिहादी जॉन ज्युनियर' म्हटले जात आहे.
आधीही असे व्हिडिओ आले होते
आयएसआयएसकडून लहान मुलांच्या हातात बंदूक देऊन त्यांच्याकडून हत्या घडवून आणण्याचा हा काही पहिला व्हिडिओ नाही. याआधीही अनेका लहान मुलांच्या हातून शिक्षा दिली गेली आहे. या वर्षाच्या सुरुवातील जानेवारीमध्ये इस्लामिक स्टेटने लहानग्या जिहादीच्या हातून रशियन हेरांना संपवले होते. त्याचा व्हिडिओ देखील प्रसिद्ध करण्यात आला होता.