आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेला शेतकरी आत्महत्यांचा विळखा; व्यावसायिक, जीवनशैलीचे घटक कारणीभूत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - शेतकरी आत्महत्येचा मुद्दा भारतातच नव्हे तर सधन मानल्या जाणाऱ्या अमेरिकेसाठीही चिंताजनक ठरत आहे. मात्र, आत्महत्येची तेथील कारणे नैसर्गिक घटक किंवा नापिकीसारखी नसून व्यावसायिक तसेच जीवनशैलीविषयक घटक, आरोग्यसेवेच्या अपुऱ्या सुविधा, उदरनिर्वाहासाठी आवश्यक घटकांचा अभाव तसेच तणाव अाहे, असे स्पष्ट झाले आहे. ही माहिती युनिव्हर्सिटी ऑफ आयोवाने (यूआय) केलेल्या सर्वेक्षणातून उजेडात आली आहे. त्यामुळे देशात चिंता व्यक्त केली जात आहे.
 
१९८० च्या दशकात अमेरिकेत शेतीवरून मोठे वादळ उठले होते. सरकारकडून शेतजमीन अधिग्रहित करण्यात आल्यामुळे सुमारे १००० पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी तेव्हा आत्महत्या केली होती. ते वादळ शमल्यानंतरही अमेरिकेत शेतकरी आणि शेतमजुरांच्या आत्महत्यांचे प्रमाण कमी झालेले नाही. अन्य कोणत्याही उद्योगातील कामगारांच्या आत्महत्यांच्या प्रमाणापेक्षा हे अधिक आहे.
 
१९९२ ते २०१० या काळात अमेरिकेत २३० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. अर्थात १९८० च्या तुलनेत या काळातील आत्महत्यांचे प्रमाण कमी आहे. पण, तेव्हाची कारणे आणि आताच्या कारणांत खूप फरक असल्याचे यूआयच्या प्राध्यापिका कोरिन पीक असा यांनी स्पष्ट केले आहे. त्यांच्या मते, आरोग्याच्या अपुऱ्या सुविधा, आर्थिक तणाव तसेच जीवनशैलीविषयक घटक ही शेतकरी आत्महत्येची मुख्य कारणे आहेत.
१९८० च्या दशकात फक्त आर्थिक कारण हेच शेतकरी आत्महत्येचे कारण होते. शेतकरी त्यांचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी झुंज देत आहेत. त्यांच्यासमोर अनेक आव्हाने आहेत, असेही त्या म्हणाल्या.
 
ट्रम्प यांच्या धोरणाने भारतवंशीय शेतकरी त्रस्त
कॅलिफोर्नियातीलयूबा सिटी भागातील भारतवंशीय शेतकरी मजूर मिळत नसल्याने खूप त्रस्त आहेत. शेतकामासाठी मजूर उपलब्ध नसल्यामुळे त्यांना यंदा पेरणीपासून कापणीपर्यंत सर्वच प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे, असे करमसिंह बन्स यांनी म्हटले आहे. यामागे ट्रम्प यांनी घेतलेले शेतीविषयक निर्णय आणि धोरणे कारणीभूत आहेत. अन्नधान्य उत्पादनात कॅलिफोर्नियाचा भाग अमेरिकेत अव्वल आहे. या भागात राहणाऱ्या भारतवंशीयांकडे सुमारे ५० हजार एकर जमीन आहे.
बातम्या आणखी आहेत...