आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पित्याने कॉमिक्समध्ये मुलीला केले ‘सुपरहीरो’

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन (ब्रिटन) - मुलांसाठी त्यांचे वडील सुपरहीरो असतात. मात्र, ४३ वर्षीय डॅन व्हाइट यांनी आपल्या मुलीला सुपरहीरो बनवले.डॅन यांची १० वर्षीय मुलगी एमिली ‘स्पायना बायफिडिया’ची रुग्ण आहे. त्यामुळे ती पूर्णपणे व्हीलचेअरवर विसंबून आहे. या आजारामुळे तिचा आत्मविश्वास खच्ची होऊ नये यासाठी डॅनने मुलीला तिच्या प्रतिभांची जाणीव करून देण्यासाठी प्रयोग केला. त्यांनी नोकरी सोडली. एका कॉमिक्सची रचना करून त्याचे नाव ‘ द डिपार्टमेंट ऑफ डिसॅबिलिटीज’ असे ठेवले. यात एमिलीला सुपरहीरोप्रमाणे दर्शवले. तिच्या दिव्यांगातूनच तिला ताकद मिळते, असे यात दाखवले आहे. या कॉमिकचे घोषवाक्य आहे, ‘बॉर्न टू बी डिफरंट, बॉर्न टू सेव्ह द वर्ल्ड.’ डॅन या कॉमिक्सच्या माध्यमातून जगभरातील सर्वच दिव्यांग मुलांना त्यांच्या विशेषत्वाची जाणीव करून देऊ इच्छितात.

डॅन यांनी सांगितले, ‘ मी जेव्हा या कॉमिकवर काम सुरू केले तेव्हा एमिली ३ वर्षांची होती. आमच्या आयुष्यात ही छोटीशी परी २००६ मध्ये आली. जन्मानंतर काही तासांतच डॉक्टरांनी सांगितले की, तिच्या मेंदूत पाणी आहे. अनेक तपासण्या केल्यानंतर स्पायना बायफिडियाचे निदान झाले. यात कण्याचा संपूर्ण विकास होत नाही. एमिलीने दिव्यांगत्वाला कमतरता समजू नये. इतरांपेक्षा आपण मागे आहोत असे तिला वाटू नये, हा माझा प्रयत्न होता. ती २ वर्षांची झाल्यावर माझ्या लक्षात आले की टीव्ही आणि पुस्तकांमध्ये तिच्यासारख्या पात्रांचा वावर नाही. त्यानंतर मला कॉमिकची कल्पना सुचली. याला पूर्ण करण्यास मला ७ वर्षे लागली. यात एमिली एका गुन्हेगारीविरुद्ध लढणाऱ्या चमूची प्रमुख आहे. या चमूतील प्रत्येक सदस्य विविध शारीरिक मर्यादा असलेले आहेत. मात्र, त्या प्रत्येकात काही खास क्षमता आहेत. ते वाईटाचा सामना करतात. त्यामुळे ही मुले इतरांपेक्षा कमी नसल्याचा संदेश जातो.’

या रचनेमुळे मुलीच्या आयुष्यात सकारात्मकता आल्याचे पाहून मला समाधान मिळते. एमिली प्रत्येक दिवशी नव्या आव्हानांना सामोरे जाते याचा मला गर्व आहे. एमिलीसारख्या इतर मुलांसाठीदेखील हे कॉमिक प्रेरणास्रोत ठरेल याचा मला विश्वास आहे. त्यांच्याकडे पाहण्याचा जगाचा दृष्टिकोन यामुळे बदलेल, असा डॅन यांना विश्वास आहे. कॉमिक आणि सुपरहीरो हे काम करण्याचे चांगले माध्यम आहे. मुलांना ते आपलेसे वाटतात.
बातम्या आणखी आहेत...