आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सौदी अरेबियातील रुग्णालयात आग; ३१ रुग्ण मृत्युमुखी, १०० हून अधिक जखमी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: जिजान प्रांतातील रुग्णालयात आगीनंतरचे नुकसानीचे दृश्‍य . रॉयटर्स
रियाध - सौदी अरेबियातील जिजान प्रांतातील एका रुग्णालयात गुरुवारी पहाटे लागलेल्या आगीत ३१ रुग्णांचा मृत्यू, तर १०० हून अधिक जण होरपळून जखमी झाले. रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावर लागलेल्या या आगीमागचे कारण अद्याप समजू शकले नाही.
प्रत्यक्षदर्शींच्या मते, शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली. रुग्णालयाला आगीने झपाट्याने कवेत घेतल्याने रुग्णांना काहीच करता आले नाही. दरम्यान, नागरिकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून राग व्यक्त केला असून यासाठी रुग्णालय व्यवस्थापन आणि निकृष्ट दर्जाच्या सुविधांना दोषी ठरवले आहे.

सौदी अरेबियाच्या सिव्हिल डिफेन्स अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय प्रमाणवेळेनुसार गुरूवारी पहाटे ४ वाजून ३० मिनिटांच्या सुमारास रुग्णालयात ही आग लागली. दरम्यान, आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशामक दलाचे २१ चमू तैनात करण्यात आले होते. आगीतील जखमी तसेच रुग्णालयातील अन्य रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यापूर्वी ऑगस्ट महिन्यात आरामको या तेल उत्पादक कंपनीच्या आवारात भीषण आग लागली होती. या आगीत आगीत १० जणांचा मृत्यू आणि २५९ होरपळून जखमी झाले होते.