आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इस्रायलमध्‍ये बसस्थानकावर गोळीबार, १ जवान ठार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: वेस्ट बँकेवर चढाई करण्यासाठी पॅलेस्टाइनच्या तंत्रशिक्षण विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी सोमवारी हेब्रॉन भागात दगडफेक केली.
जेरुसलेम - इस्रायल आणि पॅलेस्टाइनमधील संघर्षामुळे हिंसाचार वाढला असतानाच दक्षिणेकडील बसस्थानकावर अरब हल्लेखोराने अंदाधुंद गोळीबार केला. त्यात १ जवान ठार तर १० जण जखमी झाले. रविवारी रात्री उशिरा हा हल्ला झाला.

गेल्या एक महिन्यापासून दोन्ही देशांत हिंसाचार आणि तणावाची स्थिती आहे. त्यामुळे सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आलेली आहे. परंतु ही सुरक्षा भेदून हल्लेखोराने बसस्थानकाला लक्ष्य केले.जवानांकडून शस्त्र हिसकावून घेत हल्लेखोराने त्याला ठार केले. त्यानंतर सुरक्षा दलाने प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत हल्लेखोराचा खात्मा करण्यात आला. हल्लेखोर मध्यपूर्वेतील इरिट्री देशाचा नागरिक असल्याचा दावा इस्रायली प्रसारमाध्यमांकडून करण्यात आला आहे. तो अनेक वर्षांपासून इस्रायलमध्ये राहत होता. परंतु हल्लेखोराच्या राष्ट्रीयत्वाची अधिकृत माहिती स्पष्ट होऊ शकली नाही. टीव्ही मीडियातून जाहीर फुटेजमध्ये बसस्थानकावर रक्ताचा सडा पडल्याचे दिसून येते.घटनेत पाच पोलिस किरकोळ जखमी झाले. दरम्यान, इस्रायल-पॅलेस्टाइनमधील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर जेरुसलेम येथील पवित्र ठिकाणी परदेशातील सुरक्षा दलाची गरज नाही, असे अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी यांनी सोमवारी स्पष्ट केले आहे.

‘अरबाचा खात्मा ..’ गर्दीची घोषणा
देशात एक महिन्यापासून दोन्ही देशांच्या सरहद्दीवर संघर्ष सुरू आहे. त्यातच हा हल्ला झाल्याने देशात आणखीनच भीतीचे वातावरण निर्माण झाले. हल्लेखोराची हत्या झाल्यानंतर बसस्थानकाबाहेर मोठ्या संख्येने इस्रायली जमले होते. गर्दीतून ‘अरबाचा खात्मा ...’ अशी घोषणा दिली जात होती.

हस्तक्षेपाची फ्रान्सची मागणी
जेरुसलेमच्या पवित्र ठिकाणांवरील मूळ वाद मिटवण्यासाठी त्या ठिकाणी जैसे थे स्थिती ठेवली गेली पाहिजे. त्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाचे प्रतिनिधी किंवा सुरक्षा दलाची गरज भासणार आहे, असे फ्रान्सने म्हटले होते. त्यानंतर हिंसाचाराचे लोण थांबू शकेल. अन्यथा मध्यपूर्वेत अशांतता निर्माण होईल, असा इशारा फ्रान्सने दिला होता. काही देशांनीही या मागणीला पाठिंबा दिला आहे.

परराष्ट्रमंत्री केरी उभय देशांच्या नेत्यांची घेणार भेट
प्रदेशातील स्थिती हाताबाहेर जाण्याच्या अगोदर नियंत्रणात यावी यासाठी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी लवकरच इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि पॅलेस्टाइनचे राष्ट्राध्यक्ष मोहंमद अब्बास तसेच जॉर्डनचे राजे अब्दुल्ला या नेत्यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर या समस्येवर तोडगा काढला जाईल.

लोण अरब देशांत : जेरुसलेममधील ज्यू आणि मुस्लिम समुदायासाठी पवित्र ठिकाणांवरून दोन्ही देशांत तणावाला सुरुवात झाली होती. ज्यू समुदायाचे श्रद्धास्थान असलेले मंदिर आणि इस्लामची तिसरी पवित्र मशीद येथे आहे. ही मशीद पॅलेस्टाइनच्या राष्ट्रीय प्रतीकांपैकी तर मंदिर इस्रायलमधील समुदायासाठी महत्त्वाचे आहे. दोन्ही पवित्र स्थळांच्या संरक्षक भिंतीचा मूळ वाद आहे. गेल्या एक महिन्यापासून त्यावरून हिंसाचार सुरू आहे. त्याचे लोण अरब देशांतही पोहोचले. पूर्व जेरुसलेमनंतर वेस्ट बँक आणि गाझामध्ये पॅलेस्टाइन आणि इस्रायली समोरासमोर आले.