बर्लिन- जर्मनीत समलैंगिक विवाहास कायद्याची मंजुरी मिळाल्यानंतर रविवारी त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाल्याचे पाहायला मिळाले. बर्लिन, हॅम्बर्ग, हॅनोव्हरसह जर्मनीच्या अनेक शहरांत अनेक समलैंगिक जोडपी एकत्र आली होती. त्यांच्या नोंदणीसाठी रविवारी प्रशासनाने विशेष व्यवस्थादेखील केली होती.
बोडो मेंडे (६०) व कार्ल क्रिले (५९) यांनी ‘आय डू’ म्हणत परस्परांचा जोडीदार म्हणून स्वीकार केला. जर्मनीतील समलैंगिक विवाहाच्या अंमलबजावणीअंतर्गत हे पहिले जोडपे ठरले. अगदी सामान्य विवाहित जोडप्याप्रमाणे आम्हाला आमचा अधिकार मिळाला आहे. ही गोष्ट आमच्यासाठी समाधानकारक आहे, अशी प्रतिक्रिया क्रिले यांनी दिली. हे नवविवाहित दांपत्य १९७९ पासून गे मॅरेज चळवळीशी संबंधित होते. त्यांनी अनेक वर्षे हा मुद्दा सरकारसमोर मांडला होता. आजचा दिवस आमच्यासाठी ऐतिहासिक आहे, असे महापौर अँजेलिका शुटलर यांनी म्हटले आहे. जर्मनीत सुमारे ९४ हजारांवर समलैंगिक जोडपे अाहेत. त्यांच्यासाठी आता कायद्याने सर्व अडथळे दूर केले आहेत.
७५ टक्के जर्मनी बाजूने
समलैंगिक विवाहाला अनेक दशके विरोध होत असला तरी ताज्या पाहणीत मात्र जर्मनीतील ७५ टक्के लोकांनी आता अशा विवाहांच्या बाजूने कौल दिला आहे. त्यामुळे अशा जोडप्यांना सामान्य विवाहाप्रमाणे विवाह करता येऊ शकेल. जून महिन्यात जर्मनीत समलैंगिक विवाह करण्याची परवानगी देणारा कायदा पारित झाला होता. नाझी सत्ता काळापासून १९९४ पर्यंत त्यावर बंदी होती.