आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिलरी यांच्यासाठी मिशेल यांची टीव्ही जाहिरात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक तोंडावर आली आहे. त्या पार्श्वभूमीवर डेमोक्रॅटिक पार्टीच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांच्या समर्थनासाठी विद्यमान राष्ट्राध्यक्ष बराक आेबामा यांच्या पत्नी तथा फर्स्ट लेडी मिशेल आेबामा यांनी पुढाकार घेतला आहे. हिलरींनाच मत देण्याचे आवाहन करताना त्या रेडिआे, टीव्हीवरून दिसू लागल्या आहेत.
आपण जे काही करतो त्या गोष्टी घरातील लहान मुलेही पाहत असतात. या भावी पिढीला घडवण्याची क्षमता असलेल्या व्यक्तीच्या हाती राष्ट्राची सूत्रे असायला हवीत. अशीच व्यक्ती या लहानग्यांचे जीवन घडवू शकते. हिलरींनी आयुष्यातील अनेक वर्षे मुलांच्या चांगल्या संगाेपनासाठी घालवली आहेत. प्रत्येक मुलाला यशस्वी होण्याचा हक्क असतो यावर हिलरी यांचा विश्वास आहे. लहान मुलांसमोर आदर्श निर्माण करू शकणाऱ्या राष्ट्राध्यक्ष म्हणून हिलरी काम करू शकतात. त्या मुलांसाठी संघर्ष करण्याची हिंमत ठेवतात. त्यामुळेच माझा त्यांच्यावर विश्वास आहे, अशा शब्दांत मिशेल यांनी हिलरींबद्दल गौरवोद््गार काढले.

‘निवडणूक म्हणजे रिअॅलिटी शो नव्हे
व्हाइटहाऊसची शर्यत ही अत्यंत गंभीर बाब आहे, टीव्हीवरील रिअॅलिटी शो नव्हे, अशा शब्दांत हिलरी यांनी त्यांचे रिपब्लिकन प्रतिस्पर्धी डोनाल्ड ट्रम्प यांना टोला लगावला. प्रत्येकाला अर्थव्यवस्थेचे फायदे मिळायला हवेत. केवळ शिखरावरील लोकांनाच त्याचे लाभ नकोत. अमेरिकेला अधिक सुरक्षित, बळकट, स्थिर नेतृत्व देण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे क्लिंटन यांनी म्हटले आहे. नॉर्थ कॅरोलिनामधील एका सभेत त्या बोलत होत्या.

मतपरिवर्तनाचा प्रयत्न
हिलरी क्लिंटन यांच्या गटाकडून जाहिरात मोहीम राबवण्यात येत आहे. त्याअंतर्गत ३० सेकंदांची मिशेल यांची ही जाहिरात आहे. ट्रम्प यांना धोबीपछाड देण्यासाठी डेमोक्रॅटिक पार्टीने प्रसार माध्यमांचाही आक्रमकपणे वापर केला आहे. त्या माध्यमातून नागरिकांचे मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. फ्लोरिडा, नॉर्थ कॅरोलिना, आेहायो, पेनसिल्व्हेनियामध्ये जाहिरातीची घराघरांत चर्चा आहे. फर्स्ट लेडीची टीव्हीवरील ही पहिलीच जाहिरात आहे. त्याचीही देशात उत्सुकता आहे.
बातम्या आणखी आहेत...