लंडन - जगातील पहिला खून किंवा हत्या सुमारे ४ लाख ३० हजार वर्षांपूर्वी झाली होती, असा दावा स्पेनमधील शास्त्रज्ञांनी केला आहे. एका अतिप्राचीन कवटीवर स्पेनचे शास्त्रज्ञ गेल्या २० वर्षांपासून संशोधन करत होते. त्यातून त्यांनी जगातील सर्वात जुन्या खुनाचे गूढ उकलल्याचा दावा केला आहे. संशोधक लवकरच या शोधाचे निष्कर्ष घोषित करणार आहेत. या अभ्यासातून शास्त्रज्ञांना त्या काळातील अंत्यविधीच्या प्रथेबाबतही वेगळी माहिती व पुरावे हाती लागले आहेत. पैकी एका कवटीवर तीक्ष्ण घाव दिसतात. उत्तर स्पेनमध्ये दे लोस हुएसोस येथे २० वर्षांपूर्वी पुरातत्त्ववेत्त्यांच्या एका आंतरराष्ट्रीय टीमने संशोधन सुरू केले होते. त्यात बिंघमटन विद्यापीठातील मनुष्य वैज्ञानिक रॉल्फ क्वॉम व इतर दोघांचा समावेश आहे.
उत्तर स्पेनमध्ये गुहेत २८ लोकांचे अवशेष मिळाले
एका भुयारी गुहेत शास्त्रज्ञांनी खोदकाम केले. तेथे त्यांना कमीत कमी २८ लोकांचे अवशेष मिळाले आहेत. हे सर्व अवशेष ४ लाख ३० हजार वर्षांपूर्वीचे आहेत. या ठिकाणी पोहोचण्याचा एकमेव मार्ग म्हणजे १३ फूट खोल खड्डा होता, परंतु इथपर्यंत हे मृतदेह कसे नेण्यात आले, याचे गूढ शास्त्रज्ञांना सतावत असून अद्याप त्याची उकल त्यांना करता आलेली नाही. रॉल्फ क्वाम यांनी सांगितले की, हे सर्व अवशेष व पुरावे सुस्थितीत आहेत. त्यातून त्या काळचा व्यवहार, जीवनशैलीची बऱ्यापैकी कल्पना येते. खूप काही नवी माहिती मिळते. यासंदर्भातील संशोधन पीएलओएस वन या नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे.