आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विदेशी पथकांनो परता, नेपाळ सरकारचे आदेश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काठमांडू / नवी दिल्ली - गेल्या महिन्यात २५ तारखेला आलेल्या भूकंपानंतर बचाव आणि मदतकार्यासाठी नेपाळमध्ये पोहोचलेल्या जगभरातील विदेशी पथकांना नेपाळ
सरकारने आपल्या देशात जाण्याचे आदेश बजावले आहेत. केंद्रीय नैसर्गिक आपत्ती समितीच्या बैठकीत सोमवारी हा निर्णय घेण्यात आला.

उपपंतप्रधान आणि गृहमंत्री बामदेव गौतम यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. यानंतर गृह मंत्रालयाचे प्रवक्ते लक्ष्मीप्रसाद धाकल म्हणाले, महाप्रलयंकारी भूकंपाच्या नऊ दिवसानंतर आता बचावकार्य जवळपास पूर्ण होत आले आहे. ढिगा-याखाली आता मृतदेह शिल्लक राहिले असल्याची शक्यता नाही. त्यामुळे आता भूकंपग्रस्त भागात शिल्लक असलेले मदतकार्य नेपाळी संस्थाच पूर्ण करतील.

नेपाळमध्ये भारतासह जवळपास ३४ देशांचे साधारण ४,०५० तज्ज्ञ व १२९ प्रशिक्षित श्वान बचाव व मदतकार्यात गुंतले आहेत. नेपाळ सरकारच्या या निर्णयानंतर आता यातील काही तज्ज्ञ वगळता सर्व पथके माघारी फिरतील. नवी दिल्लीत विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप म्हणाले, भारताचा राष्ट्रीय आपत्तीविरोधी कार्यगट (एनडीआरएफ) नेपाळमधून माघारी बोलावला जात आहे. मात्र, भारताचे तेथील मदतकार्य सुरूच राहील.

एनडीआरएफचे संचालक जनरल ओ.पी. सिंह यांनी काठमांडूत सांगितले की, आम्ही परतण्याची योजना आखणार असून त्यानुसार माघारी येण्याचे नियोजन केले जाईल. नेपाळमध्ये भूकंपानंतर जगभरातील मदत पथके दाखल झाली खरी, परंतु दुर्गम भागात तीन दिवस उलटून गेले तरी मदत व बचाव कार्य सुरू होऊ शकले नव्हते. आता दूर गावांतही नेपाळची पथके पोहचली असल्याने सरकारने हा निर्णय घेतल्याचे मानले जाते.

मृतांची संख्या, ७२७६, दहा हजारांवर जाण्याची भीती
>७२७६ नेपाळच्या भूकंपातील बळींची संख्या झाली आहे. पंतप्रधान सुशील कोइराला यांनी ही संख्या १० हजारांवर जाण्याची शक्यता वर्तविली आहे.
>१,९०,६६४ घरे भुईसपाट झाली आहेत. साधारण, १,७३,५४७ घरांचे नुकसान झाले आहे.
>२,८२९ लोकांचा मृत्यू सिंधुपाल चौक जिल्ह्यात झाला आहे. भूकंपग्रस्त भागात हा सर्वाधिक आकडा आहे. यानंतर काठमांडूत १,२०२ जणांचा मृत्यू
झाला.