न्यूयॉर्क - जगातील टॉप - २००० प्रभावशाली कंपन्यांमध्ये भारतातील ५६ कंपन्यांचा समावेश आहे. ५६ भारतीय कंपन्यांच्या यादीत मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीजचे नाव आघाडीवर आहे. ही माहिती वाणिज्य पत्रिका "फोर्ब्स' च्या वार्षिक यादीत देण्यात आली आहे. यात ५७९ कंपन्यांसह अमेरिकेचा दबदबा कायम आहे. टॉप - १० यादीत अमेरिका व चीनच्या कंपन्यांचे वर्चस्व असून टॉप - ४ मध्ये चीनच्या बँकांनी आघाडी
घेतली आहे.
'ग्लोबल-2000' नावाने फोर्ब्सने जारी केलेल्या यादीत टॉप - २००० सार्वजनिक कंपन्यांची माहिती देण्यात आली आहे. या यादीनुसार सध्याच्या जागतिक व्यवसायावर अमेरिका व चिनी कंपन्यांचा दबदबा आहे. सलग दुसऱ्या वर्षी टॉप - १० श्रेणीत या देशांतील कंपन्यांनी स्थान मिळवले आहे. चीनमधील सर्वात मोठ्या चार बँकांनी टॉप - ४ मध्ये यंदा पहिल्यांदाच स्थान मिळवले असून चीन २३२ कंपन्यांसह जपानला मागे टाकून अमेरिकेपाठोपाठ दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. जपान २१८ कंपन्यांसह तिसऱ्या तर ब्रिटन ९५ कंपन्यांसह चौथ्या स्थानावर आहे. फ्रान्स टॉप - ५ देशांत सामील नसून हे स्थान दक्षिण कोरियाने पटकावले आहे. अर्जेंटिना व सायप्रस यादेशांना प्रथमच या यादीत जागा मिळाली आहे.
भारताच्या दोन कंपन्या वाढल्या
'फोर्ब्स'च्या यादीत यंदा भारताच्या दोन कंपन्या वाढल्या आहेत. रिलायन्स इंडस्ट्री १४२ व्या स्थानी आहे. आयआरएलचे बाजार मूल्य २७५५. ४७ अब्ज रुपये तर विक्री ४६०५ . २९ अब्ज रु. आहे. या यादीत स्टेट बँक ऑफ इंडिया १५२ व्या क्रमांकावर आहे. त्याचे मूल्य २११९. ५९ अब्ज रुपये आहे.
टॉप २०० कंपन्यावर दृष्टिक्षेप
>६१ देशांच्या कंपन्यांना मिळाले स्थान
>२५०४.९७ लाख कोटींचे उत्पन्न
>१९२. ६९ लाख कोटी रुपयांचा एकूण नफा
>१०४०५. २६ लाख कोटींची संपत्ती
>३०८३. ०४ लाख कोटींचे बाजार मूल्य
ही आहे निवड प्रक्रिया
>टॉप कंपन्यांची वार्षिक विक्री, बाजारमूल्य संपत्तीआधारे यादी
>कोणत्याही एका श्रेणीत पात्र ठरणे अनिवार्य यंदा ३,४०० कंपन्या पात्र
>यानंतर वेगवेगळ्या स्कोअरिंग आधारे यादी.
फेसबुकची २०० स्थानांची उडीसोशल नेटवर्किंग साइट फेसबुकने फोर्ब्सच्या यादीत एकाच झटक्यात तब्बल २०० अंकांची उसळी घेतली आहे. यादीत सर्वाधिक वेगाने झेप घेणाऱ्या कंपनीत फेसबुक आघाडीवर आहे. कंपनीने १४८७५. ६७ अब्ज रुपयांचे बाजारमूल्य व ८०२. ८८ अब्ज रुपयांची विक्रीच्या मदतीने २०० अंकांची उसळी घेतली असून यादीत कंपनी २८० व्या स्थानी आहे. या वेळी यादीत २०० नव्या कंपन्यांना जागा मिळाली आहे.यात ट्रॅव्हल कंपनी एक्सपीडिया व लक्झरी ज्वेलरी रिटेलर कंपनी टिफनीसह इतर काही नावांचा समावेश आहे.