आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सायबर सुरक्षेमध्ये सहकार्य करण्याची ओमानची तयारी- परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मस्कत- तेल क्षेत्रातील श्रीमंत राष्ट्र असलेल्या ओमानच्या नेत्यांनी भारतासोबतचे द्विपक्षीय संबंध दृढ करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्याचबरोबर सायबर सुरक्षेत मदतीचा हातही पुढे केला आहे. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आेमानच्या दोनदिवसीय दौऱ्यावर असून त्यांनी बुधवारी त्यांचे समकक्ष युसूफ बिन अलावी बिन अब्दुल्ला यांच्याशी विविध मुद्द्यांवर चर्चा केली.
स्वराज-अब्दुल्ला यांच्यात द्विपक्षीय, आर्थिक, संरक्षण, सुरक्षाविषयक मुद्द्यांवर चर्चा झाल्याचे सांगण्यात आले. दोन्ही देशांना प्रादेशिक पातळीवर भेडसावणाऱ्या समस्यांवरही उभय नेत्यांनी चिंता व्यक्त केली. आखाती देशांच्या सुरक्षेसाठी भारत नेहमीच आपला पाठिंबा देत आला आहे. आखाती प्रदेशात भारतीय नागरिकांचे मोठे याेगदान आहे. या प्रदेशात सुमारे ७० लाख भारतीय राहतात. आखाती देशातील संस्कृती, नियम, कायदे यांचे काटेकोरपणे पालन करून भारतीयांनी आदर्श निर्माण केला आहे. ही बाब भारताचा गौरव वाढवणारी आहे, असे स्वराज म्हणाल्या. दोन दिवसांच्या दौऱ्यात त्या आेमानचे उपपंतप्रधान सईद फाद बिन महमूद अल सैद यांचीदेखील भेट घेतील. त्याचबरोबर सुलतान बिन मोहंमद अल नौमानी यांच्यासोबतही स्वराज यांची बैठक होईल.

कच्च्या तेलाचा दोनतृतीयांश स्रोत
आखाती देश सामरिक पातळीवर भारतासाठी महत्त्वाचे आहेत. त्याचबरोबर व्यापारी पातळीवर ती देशाची गरज आहे. कारण भारतात लागणाऱ्या कच्च्या तेलाच्या दोनतृतीयांश तेल आखाती प्रदेशातून आयात केले जाते. त्यात आेमानचाही समावेश होतो. दोन्ही देशांत चांगले व्यापारी संबंध आहेत. २०१३-१४ मध्ये उभयतांत ५.७ अब्ज डॉलर्सचा व्यापार झाला होता. गेल्या पाच वर्षांत उभय देशांतील व्यापारात १२५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. दोन्ही देश १५०० संयुक्त प्रकल्पदेखील चालवतात.

विविध प्रकारच्या संधी : स्वराज
भारतात गुंतवणुकीसाठी चांगली संधी आहे. त्याचबरोबर विविध प्रकारची क्षेत्रेही त्यासाठी खुली आहेत. सरकारी धोरणही अनुकूल आहे, असे परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी आेमानच्या नेत्यांना आवाहन केले आहे. संधी अधिक असल्यामुळे द्विपक्षीय संबंध विस्तारण्यास त्याची मदत होईल, असे सांगितले.

सहमतीचे मुद्दे
आेमानने भारताला सायबर सुरक्षेच्या क्षेत्रात सर्व ते सहकार्य करण्याची तयारी दर्शवली आहे. त्यासाठी गुप्तचर संस्थांना मदत करण्यासंबंधी चर्चा झाली. भारत आणि आेमानमध्ये सुरक्षाविषयक संस्थांची स्थापना करण्यासही उभय नेत्यांमध्ये सहमती झाली आहे. दोन्ही देशांत यापुढे नौदलाची संयुक्त सराव शिबिरे होणार आहे. अँटी-पायरसीच्या मोहिमेतदेखील आेमान भारताला मदत करणार आहे.

७ लाख भारतीय
केवळ आेमानमध्ये ७ लाख भारतीय राहतात. आेमानमधील हा सर्वात मोठा परदेशी समुदाय म्हणून आेळखला जातो. अनिवासी भारतीयांमुळे देशाला सुमारे ३ अब्ज डॉलर्सचे परदेशी चलन मिळते.

परराष्ट्रमंत्रिपदाची सूत्रे घेतल्यानंतर स्वराज यांचा हा आखाती देशांचा तिसरा दौरा आहे. पहिल्यांदा गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये त्यांनी बहरीन, नोव्हेंबरमध्ये त्या संयुक्त अरब अमिरातीला भेट दिली होती. सामरिकदृष्ट्या हा प्रदेश महत्त्वाचा असल्याने दौऱ्याला महत्त्व आहे.