आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फ्रान्सकडून धाडसत्र, सिरियामध्ये अतिरेक्यांना घेरले, अड्डे उद्ध्वस्त

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हल्ला करण्यासाठी निर्वासित म्हणून आश्रयासाठी आलेल्या अब्देलहामिद आबौद या दहशतवाद्याचे छायाचित्र सोमवारी जारी करण्यात आले. - Divya Marathi
हल्ला करण्यासाठी निर्वासित म्हणून आश्रयासाठी आलेल्या अब्देलहामिद आबौद या दहशतवाद्याचे छायाचित्र सोमवारी जारी करण्यात आले.
पॅरिस- राजधानीतील हल्ल्यानंतर फ्रान्सने सिरियातील आयएसच्या अड्ड्यांना उद्ध्वस्त करण्यासाठी हल्ले वाढवले. दुसरीकडे देशात धाडसत्र राबवून आयएसच्या २३ संशयित दहशतवाद्यांना अटक तर १०० जणांना स्थानबद्ध करण्यात आले. पोलिसांनी १७० ठिकाणी छापे टाकले होते. दक्षिणेकडील ल्यॉन शहरात दहशतवाद्यांनी दडवून ठेवलेला शस्त्राचा मोठा साठाही जप्त करण्यात आल्याची माहिती पंतप्रधान मॅन्युएल वाल्स यांनी सोमवारी दिली.
देशातील अनेक शहरांत पोलिसांनी भल्या पहाटेच ही कारवाई करताना संशयितांना ताब्यात घेतले. राजधानीच्या पूर्वेकडील बॉबिग्नी उपनगरात मोठी कारवाई करण्यात आली. आतापर्यंत तेथे १३ धाडी टाकण्यात आल्या. देशभरात १७० धाडी टाकण्यात आल्या होत्या, असे पोलिस सूत्रांनी स्पष्ट केले. दक्षिणेकडील भागात मोठा शस्त्रसाठा आढळून आला. त्यात रॉकेट लाँचर, रायफल, बुलेटप्रूफ जॅकेट, हँडगन इत्यादी साहित्य आढळून आले. पोलिसांनी ते जप्त केले आहे. टौलूसमध्येदेखील पोलिसांनी धाड टाकली. ग्रीनोबल शहरातही अशी कारवाई करण्यात आली असून अतिरेक्यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, पॅरिस हल्ल्यानंतर लागू झालेल्या आणीबाणीमुळे पोलिसांना काही अतिरिक्त अधिकार मिळाले आहेत. त्यानुसार ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येते. शुक्रवारी झालेल्या हल्ल्यात १२९ जणांचा मृत्यू, तर ३५० जण जखमी झाले होते.
युरोपमध्ये आणखी हल्ल्याची शक्यता
पॅरिस हल्ल्यासारखाच आत्मघातकी हल्ला युरोपातील अन्य देशांतही होऊ शकतो. कारण तशा प्रकारच्या कटाचे धागेदोरे मिळाले आहेत. त्यामुळे केवळ फ्रान्सविरोधातच नव्हे, तर इतर युरोपियन देशांच्या विरोधातही असे कृत्य होऊ शकते, असे फ्रान्सचे पंतप्रधान मॅन्युएल वाल्स यांनी म्हटले आहे.

दोन हल्लेखोरांची आेळख पटली
पॅरिस हल्ल्यातील आणखी दोन हल्लेखोरांची आेळख पटली आहे, अशी माहिती फ्रान्सच्या सरकारी वकिलांनी दिली. सॅमी अॅमिमोर (२८) असे कटात सामील दहशतवाद्याचे नाव असून बाटाक्लान कॉन्सर्ट हॉलवरील हल्ल्यामागेही त्याचा हात होता. त्या घटनेत ८९ जणांचा मृत्यू झाला होता. अन्य एका हल्लेखोराचे नाव अहमद अल मोहंमद असे आहे; परंतु त्याच्या कागदपत्रांची पडताळणी अद्याप बाकी आहे.

प्रशिक्षण केंद्र उडवले
पॅरिस हल्ल्यानंतर खवळलेल्या फ्रान्सने इस्लामिक स्टेटच्या सिरियातील प्रशिक्षण केंद्र आणि इतर अड्ड्यांना नेस्तनाबूत केले. फ्रान्सने रात्रीतून केलेल्या हवाई कारवाईत एकट्या राका या आयएसच्या ताब्यातील शहरावर ३६ बाँब डागले. त्या हल्ल्यामुळे शहर हादरून गेले होते. राका शहराच्या उत्तर आणि दक्षिणेकडील भागात ही कारवाई करण्यात आली.

एक वर्षापूर्वी दिला इशारा
फ्रान्समध्ये इस्लामिक स्टेट दहशतवादी हल्ला करणार असल्याचा इशारा तुर्कीने एक वर्षापूर्वी दिला होता. डिसेंबर २०१४ आणि जून २०१५ मध्ये हा धोका वर्तवला होता, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

बेल्जियमशी कनेक्ट, ब्रुसेल्स, पॅरिस हल्ल्यातील आत्मघाती हल्लेखोरापैकी एकाचा संबंध बेल्जियमशी असल्याचा दावा तपास अधिकाऱ्यांनी केला आहे. हल्लेखोरांपैकी असलेल्या ब्राहिम अब्देस्लामचे नाव पोलिसांकडील अनेक प्रकारच्या दहशतवादी कृत्यांच्या यादीत आढळून आले आहे.