आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खरे प्रेम: प्रेमीजनांच्या भेटीसाठी मोफत विमानसेवा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - १९४४च्या दुसऱ्या महायुद्धात सहभागी झालेला अमेरिकी सैनिक ७० वर्षांनंतर आपल्या प्रेमिकेला पुन्हा भेटणार आहे. नॉरवूड थॉमस आता ९३ वर्षांचे झाले आहेत. ते ८८ वर्षीय प्रेमिका जॉयसी मॉरिसला भेटण्यासाठी व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी ऑस्ट्रेलियाला जाणार आहेत. मॉरिसला पुन्हा भेटणे जीवनातील सर्वात मोठा आनंदाचा क्षण असेल, असे थॉमस यांनी सांगितले.

दोघांनी अलीकडेच स्काइपवरून परस्परांशी संवाद साधला होता. ब्रिटनमध्ये दोघांचे प्रेम बहरले होते. ते क्षण या दोघांनी या निमित्ताने पुन्हा अनुभवले. आठवले. काही दिवसांनंतर थॉमस यांना फ्रान्सच्या नॉर्मेंडी येथे पाठवण्यात आले होते. मॉरिस सध्या ऑस्ट्रेलियात राहतात. दोघे पहिल्यांदा थेम्स नदीच्या किनाऱ्यावर भेटले होते. त्यावेळी थॉमसचे वय २१ वर्षे तर मॉरिस १७ वर्षांच्या होत्या. त्यावेळी थॉमस लंडनच्या बाहेरील भागात तैनात होते. काही दिवसांतच दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. परंतु युद्धामुळे दोघेही वेगळे झाले. त्यानंतर दोघांची कधीही भेट होऊ शकली नाही. मॉरिस यांची दृष्टी आता कमी झाली आहे. थॉमस यांच्या मुलाने दोन महिन्यांपूर्वी दोघांचा संवाद घडवून आणला. या दरम्यान दोघे गप्पांत रंगून गेले होते. त्यांच्या गप्पा दोन तास चालल्या. मॉरिस यांनी आपल्या जुन्या प्रेमाला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. परंतु थॉमस आजारी आहेत. मॉरिसच्या भेटीला जाण्यासाठी लागणारा खर्च उचलण्याइतके उत्पन्नही आता थॉमस यांच्याकडे नाही. ते सध्या व्हर्जिनियात राहतात. म्हणूनच त्यांनी ऑस्ट्रेलियात जाण्याची असमर्थता दर्शवली. दोघांमध्ये १६ हजार किलाेमीटरचे अंतर आहे. ‘तुला भेटण्याची इच्छा आहे. तुझी गळाभेट घेऊन तुला गुड नाइट म्हणावं वाटतंय. पण सध्या तरी मी येईपर्यंत तू स्वत:ची काळजी घे बरं का.’ असे थॉमस यांनी मॉरिस यांना आग्रहपूर्वक बजावले आहे.

ही प्रेमकहाणी उजेडात आली. त्यानंतर एअर न्यूझीलंडने थॉमस आणि मुलगा स्टीव्ह यांना मोफत ऑस्ट्रेलियाला पाठवण्याची व्यवस्था केली आहे. थॉमस म्हणाले, लोकांचा दयाळू भाव पाहून मी चकीत झालोय. स्थानिक लोकांना या प्रेमीजनांची माहिती मिळाली. तेव्हा त्यांची भेट घडवण्यासाठी लोकांनी निधी जमा केला. ३०० हून अधिक लोकांनी देणगी दिली. उर्वरित लोकांनी थॉमस यांना धनादेश दिले. आतापर्यंत ७५०० डॉलरहून अधिक (सुमारे लाख रुपये) जमा झाले आहेत.