पलानो(अमेरिका) - मुलीने कायम आनंदी राहावे असे प्रत्येक आईला वाटत असते. तिच्या आनंदासाठी ती काहीही करण्यासाठी तयार असते. मात्र, अमेरिकेतील ५४ वर्षीय थॉमसन यांनी
आपल्या २८ वर्षीय मुलीसाठी जो आनंद दिला आहे, तो जगभरासाठी एक उदाहरण ठरला आहे.
थॉमसन आपली मुलगी केलीला नेहमी नाराज असल्याचे पाहत होती. लग्नाच्या अनेक दिवसांनंतरही तिला आईचे सुख मिळू शकले नव्हते. त्यामुळे मुलीच्या सुखासाठी थॉमसनने एक अनोखे पाऊल उचलले. त्यांनी सरोगेट मदर होण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी मुलगी आणि जावयाला सुरुवातीस तयार करावे लागले. यानंतर गेल्या वर्षी एप्रिलमध्ये आपली मुलगी आणि जावयाच्या इनव्हिट्रो फर्टिलायझेशनपासून प्राप्त गर्भातून थॉमसन गरोदर राहिल्या आणि त्यांनी एका गोंडस मुलीला जन्म देऊन मुलगी आणि जावयाला सुखद भेट दिली.
केली म्हणाली, मला व पतीला तीन वर्षांपासून बाळ हवे होते. मात्र, त्यात यश मिळाले नाही. यानंतर आम्ही इन्फर्टिलिटी उपचाराचा निर्णय घेतला. मात्र, जेवढ्या वेळा गरोदर राहिले तेवढ्या वेळा गर्भपात झाला. आम्ही दहा वेळा चाचणी केली तरीही गर्भपाताचे निदान होऊ शकले नाही. यानंतर माझ्या आईने एक मोठी भेट देणार असल्याचे सांगितले.
थॉमसन यांनी बुधवारी मेडिकल सेंटरमध्ये जवळपास तीन किलो वजनाच्या एक मुलीस सिझेरियन पद्धतीने जन्म दिला. मुलीचे नाव ट्रेसी ठेवण्यात आले आहे. थॉमसन म्हणाल्या, मुलीसाठी एवढे करू शकले याचे मला खूप बरे वाटते. मुलगी २८ वर्षांची तर जावई ३० वर्षांचा आहे. या वयापर्यंत त्यांचे कुटुंब पूर्ण व्हायला पाहिजे होते. मात्र, कोणत्या ना कोणत्या कारणास्तव ते झाले नाही. केली यांचे पती मॅकीशॉक म्हणाले, ती एक खास महिला आहे. आम्हा दोघांसाठी तिने जे केले त्यासाठी धैर्य लागते. मेडिकल सेंटरमधील डॉक्टर जोसेफ लेवेनो म्हणाले, एका आईने गौरवास्पद पाऊल उचलले आहे.
डॉक्टरांचा सल्ला
थॉमसन यांची सात वर्षांपूर्वी हार्मोन थेरपी करण्यात आली होती. आपले शरीर पुन्हा एकदा आई होण्यास सक्षम आहे काय, यासाठी टेक्सास येथील पलानो मेडिकल सेंटरच्या डॉक्टर्सचा सल्ला घेण्यात आला. त्यांनी त्यास संमती दिली. डॉक्टरांनी वैद्यकीय तपासणीस परवानगी दिली.