अहमदाबाद- सध्या केरळमध्ये झालेल्या हायप्रोफाईल लग्नाची जोरदार चर्चा सुरु आहे. केरळचे अनिवासी भारतीय अब्जाधिश रवी पिल्लई यांनी पोरीच्या लग्नावर तब्बल 55 कोटी रुपये खर्च केले. पण आता त्यापेक्षाही हायप्रोफाईल लग्नाची माहिती समोर आली आहे. इटलीतील फ्लोरेंस शहरातील अब्जाधिश गुजराती बिझनेसमन योगेश मेहता यांनी मुलगा रोहन याच्या लग्नावर तब्बल 140 कोटी रुपये खर्च केले. भारतीय अनिवासी व्यापाऱ्यांची ही कोटीच्या कोटी उड्डाणे बघितल्यावर डोळे पांढरे झाल्याशिवाय राहत नाहीत.
रोहन मेहताचे लग्न याच शहरातील फॅशन कंपनी सांभाळणारी रोहनी हिच्यासोबत शाही थाटात झाले. येथील फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये तीन दिवस हा सोहळा चालला. या लग्नात देश-विदेशातून 500 पेक्षा जास्त पाहुणे आले होते. योगेश मेहता गल्फ देशांमध्ये टॉप 25 अब्जाधिशांमध्ये येतात.
हत्तीवर काढता आली नाही वरात
योगेश मेहता यांना या लग्नाची वरात हत्तीवर काढायची होती. पण स्थानिक प्रशासन आणि अॅनिमल वेलफेअर संघटनेने याची परवानगी दिली नाही. तरीही अगदी शाही लव्याजम्यासह ही वरात काढण्यात आली. आर्नो रिव्हरजवळ असलेल्या एका आलिशान हॉटेलमध्ये लग्नाचे रिसेप्शन देण्यात आले होते.
कोण आहेत योगेश मेहता
51 वर्षीय योगेश मेहता 28 वर्षांचे असताना दुबईला गेले होते. त्यांनी येथे पेट्रोकेम मिडिल ईस्ट नावाच्या कंपनीची स्थापना केली. त्यानंतर त्यांच्या कंपनीने पेट्रोकेम युकेसोबत टायअप केले. काही वर्षांनी दुबई, भारत, युके आणि बेल्जिअममध्ये कंपनीचा विस्तार केला. सध्या त्यांच्या नावे 623 मिलियन अमेरिकी डॉलर एवढी संपत्ती असल्याचे सांगितले जाते.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, या शाही लग्नसोहळ्याचे डोळे दिपवणारे फोटो.....