आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्त्री शक्ती : हंग हिसयू चू, तैवान संसदेच्या उपाध्यक्ष, पहिल्या विजयावेळी वडिलांचे निधन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चर्चेत - तैवान संसदेच्या उपाध्यक्षांनी नुकतीच राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे. त्या विजयी झाल्यास तैवानच्या त्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष होतील.
हंग चू यांचे वडील तैवानमध्ये राजकीय आरोपांनी ग्रस्त होते. १९४६ पर्यंत सरकारच्या मोनोपॉली ब्युरोमध्ये काम करत होते. हंग चू यांच्या जन्माअाधी दोन वर्षे ते चीनमधून तैवानला आले आणि तैवान शुगर कॉर्पोरेशनमध्ये उपव्यवस्थापक झाले. त्या वेळी कंपनीच्या जनरल मॅनेजरला कम्युनिस्ट पार्टीचा एजंट असल्याच्या आरोपाखाली मृत्युदंडाची शिक्षा देण्यात आली होती. हंग चू यांच्या वडिलांनाही या प्रकरणात तीन वर्षांचा तुरुंगवास झाला. सुटका झाल्यानंतर नोकरी न मिळाल्याने संघर्ष सुरू झाला.

शाळेच्या काळात हंग यांनी वक्तृत्व आणि कथाकथनच्या अनेक स्पर्धा जिंकल्या होत्या. चायना टाइम्सने एकदा "द टॉकेटिव्ह लिटिल जिनियस' म्हणून टिप्पणी केली होती. हंग यांनी कायद्याचे शिक्षण घ्यावे, अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती. पहिल्या प्रयत्नात त्यांना परीक्षेत यश मिळाले नाही. त्यावेळी हंग यांनी घर आणि शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी ट्यूटर म्हणून काम केले होते. सायंकाळी त्या ट्यूशन घेत आणि दिवसा अभ्यास करत. यादरम्यान त्यांना शिहू हायस्कूल ऑफ इंडस्ट्री अँड कॉमर्समध्ये काम मिळाले. त्यानंतर त्या तैइपे म्युनिसिपल शियफेंग सीनियर हायस्कूलमध्ये शिकवत संचालकपदापर्यंत पाेहोचल्या.

अकरावीपासूनच त्यांना राजकारणाची ओढ लागली होती. त्या कुमिंगतांग पक्षाशी जोडल्या गेल्या. त्याचवर्षी त्यांना उत्कृष्ट विद्यार्थिनी म्हणून गौरविले. १९८९ मध्ये त्या पहिल्यांदा विधिमंडळाची निवडणूक लढणार होत्या. मात्र, त्यांना संचालकांनी सुटीस नकार दिला. केवळ साप्ताहिक सुटीदिवशी त्या चुलत भावासोबत पोस्टर लावत होत्या. विरोधकांनी त्यांच्या अनुपस्थितीत प्रचार केला. मात्र, तरीही त्यांचा काही मतांनी विजय झाला. मात्र, हे यश पाहायला त्यांचे वडील राहिले नाहीत. या जगाचा निरोप घेण्यासाठी वडील कदाचित आपल्या विजयाचीच वाट पाहत होते की काय, अशी त्यांची भावना झाली. त्यानंतर सलग आठ वेळेस हंग यांनी विजय प्राप्त केला. हंग यांनी कॅन्सरवर यशस्वीरीत्या मात केली आहे.

जन्म : ७ एप्रिल १९४८
वडील : हंग शी यू
शिक्षण : तैपेई सेकंड गर्ल्स हायस्कूलमध्ये शिक्षण, कॉलेज ऑफ चायनीज कल्चरमधून लॉचे शिक्षण