दरवेळी बर्कशायर हॅथवेच्या बैठकीची सुरुवात कंपनीवरील चित्रपटाने होत असते. मात्र, यावेळचा चित्रपट आगळावेगळा होता. यात बफे हे प्रख्यात बॉक्सर फ्लॉयड मेवेदरला आखाड्यात दोन-दोन हात करण्याचे आव्हान देत असल्याचे दिसले.
ओमाहा (अमेरिका) - नेब्रास्काच्या ओहामा शहरात दरवर्षीप्रमाणे मागील शनिवारी बर्कशायर हॅथवे कंपनीच्या समभागधारकांची वार्षिक सर्वसाधारण बैठक झाली. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीतील गुंतवणूकदार वॉरेन बफे हे कंपनीचे सीईओ आहेत.
जगभरातून ४० हजारांपेक्षा जास्त गुंतवणूकदार बफेंकडून नफा कमावण्याचा मंत्र घेण्यासाठी आले होते. स्थानिक वेळेनुसार रात्री आठ वाजता बैठक सुरू झाली. बफे आणि उपाध्यक्ष चार्ली मंगर यांना प्रत्येक जण नफ्याशी निगडित प्रश्न विचारत होता. हा सिलसिला तब्बल चार तासांपासून सुरूच होता.
साडेबाराच्या सुमारास एक मुलगा उभा राहिला अन् म्हणाला-"मी सातवीचा विद्यार्थी आहे. वॉरेन मला काही विचारायचे आहे.' सर्वांना वाटले हा एखाद्या गुंतवणुकदाराचा मुलगा आहे, तो गुंतवणुकीवरच विचारणार. तो म्हणाला - "तुम्ही इतके मित्र कसे काय बनवता, माझे तर मोजकेच आहे. तुम्ही अशी कोणती जादू करता?' या वाक्यासरशी सर्वांच्या नजरा त्या मुलाकडे वळल्या. नंतर माहीत पडले की तो वॉरेन यांना ऐकण्यासाठी दोन हजार किलोमीटर लांब फ्लोरिडातून आला. काय उत्तर द्यावे या विचारात बफे असतानाच चार्ली म्हणाले -"आम्ही लोकांना श्रीमंत बनवतो, यामुळेच इतके मित्र आहेत.' या उत्तराने मुलाचे समाधान होईना. शेवटी बफे म्हणाले -"बघ, मी तुझ्याएवढा होतो तेव्हा माझ्यावरही इतर मुले खार खात. ज्यांचा चाहता होतो, त्यांच्या चांगल्या गोष्टी आत्मसात केल्या. तुला एक प्रयोग सांगतो. दोन याद्या कर. पहिली- वर्गातील मुलांबाबत, त्यांच्या त्यात चार गोष्टी तुला आवडतात. दुसरी- ज्या चार बाबी तुला नावडतात. चांगल्या गोष्टी अवलंबण्याचा प्रयत्न करायचा. मग बघ मित्रांची संख्या कशी वाढत जाते. '