आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुसळधार पावसाने भूस्खलन; बांगलादेशात 105 जणांचा बळी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पोलिस आणि सुरक्षा पथके दुर्गमभागात मदत कार्य पोहाेचवण्यासाठी निसर्गाशी संघर्ष करत आहेत. - Divya Marathi
पोलिस आणि सुरक्षा पथके दुर्गमभागात मदत कार्य पोहाेचवण्यासाठी निसर्गाशी संघर्ष करत आहेत.
ढाका - बांगलादेशात मुसळधार पावसामुळे भूस्खलन झाले असून  यात १०५ जणांचा बळी गेल्याचे वृत्त आहे. १०० पेक्षा अधिक नागरिक जखमी झाले आहेत. चटगावच्या तीन जिल्ह्यांत पावसाचा जोरदार तडाखा बसला. पर्वतीय क्षेत्रात भूस्खलन झाले.
 
हवामान खराब असल्याने बचावकार्यात अडथळे येत आहेत. येथील संवाद यंत्रणाही कोलमडली आहे. दुर्गम भागाशी संपर्क होऊ शकलेला नाही. नद्या दुथडी भरून वाहत आहेत.   संततधार पावसानंतर ढाका आणि चित्तगाव शहरात सर्वाधिक पावसाची नोंद झाली. बांगला देशात सोमवारपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. रंगमती येथे ७६, रानगुनिया येथे ११ आणि चंदनैश येथे ११, बादरबन येथे ७ जणांचा बळी गेल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले.
 
चटगाव जिल्हा प्रशासनाने दोन चमूंचे गठन केले आहे. यात दोन जिल्हाधिकाऱ्यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. पावसामुळे आणखी भूस्खलनाच्या घटना होऊ नयेत यासाठी हे चमू नियुक्त करण्यात आले आहेत. डोंगराळ भागात हे चमू काम करतील. रंगमती या पर्वतीय भागातील जिल्ह्याचा रस्ता एका रात्रीत भूस्खलनाने बंद झाला. बळींमध्ये आदिवासी जनजातींच्या नागरिकांची संख्या सर्वाधिक आहे. बचाव मोहिमेतील जवानांच्या मते जितके बळी गेले आहेत तितकेच भूस्खलनात गाडले गेले आहेत. मात्र, या अंदाजाला अधिकृत्र दुजोरा दिलेला नाही.
 
आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख रियाज अहमद यांनी म्हटले आहे की, अद्याप सर्व प्रभावित परिसरापर्यंत पोहोचता आलेले नाही. पाऊस थांबल्यानंतरच नुकसानाचा अंदाज लावणे शक्य होईल. भारतीय सीमेजवळील रंगामाटी येथे दोनदा वादळ आले. येथील बहुतांश घरे मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली. राजधानी ढाका आणि बांगलादेशाच्या सर्वात मोठ्या किनारी शहर चटगाव येथे वादळ आणि पावसामुळे वाहतूक थोपवण्यात आली आहे.   बंगालच्या उपसागरात कमी दबाव निर्माण झाल्याने सोमवारपासून संततधार सुरू आहे.

मोरा चक्रीवादळानंतर अतिवृष्टी
बांगलादेशच्या आग्नेय भागात मोरा चक्रीवादळ आदळल्यानंतर हवामानात वेगाने बदल झाले. गेल्या महिन्यात धडकलेल्या मोरा वादळात ८ जणांचा बळी गेला होता.  

मृतांमध्ये लष्करी अधिकाऱ्यांचा समावेश
बळींमध्ये ४ लष्करी अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. आग्नेय बांगलादेशला याचा सर्वाधिक तडाखा बसला. बळींची संख्या वाढण्याची भीती स्थानिक आपत्ती व्यवस्थापन विभागाने वर्तवली आहे. अनेक जण भूस्खलनात गाडले गेल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.  रंगमती या पर्वतीय जिल्ह्यातील बळींची संख्या सर्वाधिक म्हणजे ७६ सांगण्यात आली आहे.