वॉशिंग्टन- अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक पुढील वर्षी होणार आहे; परंतु त्याअगोदर होणाऱ्या उमेदवारांच्या चर्चेला खूप महत्त्व असते. पहिल्या चर्चेत डेमोक्रॅटिक पार्टीच्या चार दावेदारांना हिलरी क्लिंटन यांनी पिछाडीवर टाकून डिबेट
आपल्या नावावर करून टाकली.
दुसरीकडे गुरुवारी लास वेगासमधील जाहीर सभेत त्यांनी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या स्थलांतर आणि बंदूक नियंत्रण कायद्याच्या फेररचनेचे समर्थन करून निवडणुकीच्या दृष्टीने आपली पकड मजबूत केली.
चेहऱ्यावर प्रसन्नता आणि अतिशय निरामयपणे हिलरींनी डिबेटमध्ये आपल्या विरोधकांच्या प्रश्नांना सडेतोड उत्तरे दिली. विशेष म्हणजे हिलरींनी त्यांच्या पक्षांतर्गत विरोधक सिनेटर बेर्नी सँडर्स यांचा खुबीने नामोल्लेखही टाळला. त्यांच्यावर पुरेपूर हल्ले चढवले. सँडर्स यांनीही त्यांच्यावर आरोप केले. दोन्ही नेत्यांनी खासगी आरोप मात्र केले नाहीत. स्थलांतरितांविषयी रिपब्लिकन नेत्यांच्या मतांशी मी सहमत नाही. खरे तर अापला देश स्थलांतरित नागरिकांनी मिळून बनला आहे. त्यांच्या प्रयत्नातून त्याची जडण-घडण झाली आहे. स्थलांतरित हीच खरी आपली आेळख आहे, असे हिलरी म्हणाल्या. चर्चेत अन्य दावेदार मार्टिन ओमली, जिम वेब आणि लिंकन शेफी यांनीही सहभागी घेतला होता. ही चर्चा अडीच तास चालली. दरम्यान, चर्चेतून हिलरींनीच राष्ट्राध्यक्ष व्हावे हे दाखवून दिले आहे, अशी प्रतिक्रिया हिलरी यांचे पती तथा माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांनी दिली आहे.
मी विकासवादी : हिलरींनी आपण विकासवादी असल्याचे सांगून सत्तेवर आल्यास कष्टकरी मध्यमवर्गीयांचे उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन दिले.
रोजगार वाढवणार
हिलरी यांनी जाहीर सभेत रोजगाराचा प्रश्न जोरकसपणे मांडला. देशात रोजगार निर्मितीची गरज आहे. सत्तेवर आल्यानंतर हा प्रश्न धसास लावला जाईल. तशी योजना आपल्याकडे तयार आहे. एवढेच नव्हे, तर वेतनात वाढ करण्यासही अनुकूलता असेल.
करप्रणाली फेररचनेचे समर्थन
देशातील करप्रणाली जाचक स्वरूपाची आहे. त्याची पुनर्रचना होणे गरजेचे आहे. करसवल देण्यात आल्यास मध्यमवर्गीयाला त्याचा अधिक फायदा होऊ शकेल. देशातील मध्यमवर्गीयांना उभे करण्याची हीच वेळ आहे, असे त्यांनी येथील एका सभेतून स्पष्ट केले.
रस्ते, पुलांचाही मुद्दा
हिलरींनी अंतर्गत विकासाच्या मुद्द्यावर विरोधकांची पंचाईत करून टाकली. त्यांनी देशातील रस्ते-पूल यांच्या देखभालीचा प्रश्न मांडला. त्याकडे नजीकच्या काळात लक्ष दिले गेले नाही, तर अप्रगत देशातील दळणवळणासारखी स्थिती होऊ शकते. म्हणूनच रोजगार आणि पायाभूत सुविधा यांचा मेळ घातला गेला पाहिजे. बेरोजगारांना रस्ते, पूल, विमानतळ दुरुस्ती, बांधकाम इत्यादी क्षेत्रात रोजगाराची संधी निर्माण करून देता येऊ शकते, असा दावा त्यांनी सभेतून केला.