आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डेमोक्रॅटिक पार्टीच्या अध्यक्षपदी स्थलांतरित पेरेज यांची निवड, ट्रम्‍प यांच्‍या धोरणांचा सामना करणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अटलांटा - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डाेनाल्ड ट्रम्प यांच्या इमिग्रेशन धोरणाचा सामना करण्यासाठी डेमोक्रॅटिक पार्टीने नवीन मार्ग शोधून काढला आहे. शनिवारी पक्षाने थॉमस ई. पेरेज यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड केली. पेरेज भलेही आेबामा यांच्या कार्यकाळात २०१३-२०१७ दरम्यान कामगारमंत्री होते. परंतु त्यांचे आई-वडील दोघेही स्थलांतरित होते आणि लॅटिन अमेरिकी देशातून आले होते. पेरेज डेमोक्रॅटिक पार्टीचे पहिले लॅटिनो अध्यक्ष आहेत.  
 
पक्षाच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत पहिल्या फेरीत पेरेज पिछाडीवर पडले होते. दुसऱ्या फेरीत त्यांना २३५ मते मिळाली होती. त्यात त्यांचा विजय झाला. राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत हिलरी क्लिंटन यांचे प्रतिस्पर्धी बर्नी सँडर्स यांचे प्रतिनिधी किथ अॅलिसन यांना २०० मते मिळाली. अॅलिसन पक्षाचे उपाध्यक्ष बनले आहेत. अॅलिसन अमेरिकेच्या संसदेत निवडून जाणारे पहिले मुस्लिम आहेत. सगळ्या सँडर्स समर्थकांनी अॅलिसन यांना पाठिंबा दिला होता. हिलरी-आेबामा समर्थकांनी पेरेज यांच्या बाजूने कौल दिला. विजयानंतर पेरेज म्हणाले, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या कार्यकाळात अनेक मोठी आव्हाने आहेत. आता योग्य पावले उचलली नाहीत तर भविष्यात जनता आपल्याला जाब विचारेल. 
 
पेरेज यांनी कामगारमंत्री असताना आेव्हरटाइमची रक्कम वाढवली होती. त्याचा वाईट परिणाम उद्योग जगतावर होईल, अशी प्रतिक्रिया तेव्हा रिपब्लिकन पार्टीने दिली होती. आता पेरेज यांच्यासमोर आगामी निवडणुकीत उमेदवारांची निवड करण्यापासून ट्रम्प यांच्या धोरणांना उत्तर देण्यापर्यंतची अनेक आव्हाने आहेत.  

लॅटिन अमेरिकी देशातील मूळ  
पेरेज यांचा जन्म ७ ऑक्टोबर १९६१ रोजी अमेरिकेत झाला. परंतु त्यांचे आई-वडील लॅटिन अमेरिकी देश डोमेनिकल प्रजासत्ताकमधून आले होते. वडील सर्जन होते. त्यांनी दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेच्या सैन्यात सामील होऊन नागरिकत्व मिळवले होते. टॉम १२ वर्षांचे असताना वडिलांचा मृत्यू झाला. आई ग्रेस त्यांचे वडील रफेल ब्राशे  यांच्यासोबत १९३० मध्ये अमेरिकेत आल्या होत्या. रफेल अमेरिकेत डोमेनिकनचे राजदूत होते. पुढे त्यांच्याच देशाने त्यांची हकालपट्टी केली होती. पुढे ते अमेरिकेत राहू लागले. पेरेज यांच्या निवडीनंतर डेमोक्रॅटिक पार्टीच्या सदस्यांमध्ये उत्साह संचारला आहे. पक्षाची पुढील दिशा ठरवण्यासाठी पक्षाची ही रणनीती महत्त्वाची ठरणार आहे. 
 
व्हाइट हाऊस कव्हर करणाऱ्या पत्रकारांच्या डिनरला जाणार नाहीत ट्रम्प  
डोनाल्ड ट्रम्प व माध्यमांतील शत्रुत्व वाढत चालले आहे. व्हाइट हाऊसचे वृत्तांकन करणाऱ्या पत्रकारांना दिल्या जाणाऱ्या भोजनात ट्रम्प सहभागी होणार नाहीत. २९ एप्रिल रोजी हे भोजन दिले जाणार आहे. सामान्यपणे समारंभासारखे याचे स्वरूप असते. त्यात पत्रकारांसह सेलिब्रिटीदेखील सहभागी होतात. त्यात हास्यविनोद होतात. त्यात आेबामा आठ वेळा सहभागी झाले होते. परंतु यंदाच्या कार्यक्रमात मला सहभागी होता येणार नाही. माझ्या तुम्हाला शुभेच्छा, असा संदेश ट्रम्प यांनी ट्विटरवरून दिला आहे. पत्रकारांसाठी डिनरची सुरुवात १९२१ मध्ये झाली होती. तत्कालीन राष्ट्राध्यक्ष कॅल्व्हिन कुलीज त्यात सहभागी झाले होते. १९३० मध्ये राष्ट्राध्यक्ष टॅफ्ट यांच्या मृत्यूमुळे डिनर रद्दही झाले होते. १९७२ मध्ये निक्सन सहभागी झाले नव्हते. १९७८ मध्ये जिमी कार्टर आजारपणामुळे सहभागी होऊ शकले नव्हते. त्याशिवाय रोनाल्ड रेगन १९८१ मध्ये गोळी लागल्याने डिनरमध्ये सहभागी झाले नव्हते. महिला पत्रकारांना निमंत्रण न दिल्यास डिनरमध्ये सहभागी होणार नाही, अशी भूमिका तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांनी घेतली होती.  
 
मला आनंद झालेला नाही  
मी विजयाबद्दल तुमचे अभिनंदन करतो. परंतु तुमच्या विजयामुळे मला आनंद झालेला नाही. रिपब्लिकन पार्टीलाही तसा झालेला नाही - डोनाल्ड ट्रम्प, राष्ट्राध्यक्ष, अमेरिका.  
बातम्या आणखी आहेत...