आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जंगलात ३ वर्षांचा चिमुकला ७२ तास लांडगे-अस्वलांसोबत...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सैबेरिया (रशिया) - तीन वर्षांच्या सेरिन यास रशियन पोलिसांनी अखेर शोधून काढले. तीन दिवसांपूर्वी सैबेरियाच्या जंगलात तो हरवला होता. ७२ तास तो जंगलात लांडगे, अस्वलांसोबत राहिला. या भागात रात्रीचे तापमान शून्याच्याही खाली होते. सेरिनने तीन दिवस फक्त चॉकलेटवर काढले. देवदारच्या जंगलात पाने अंथरूण तो झोपत होता. आता सेरिन सापडला म्हणून अख्ख्या गावात आनंदोत्सव साजरा होत आहे. प्रशासनाने तर त्याचे टोपणनाव ‘मोगली’ असे ठेवले आहे.

सेरिनच्या शोधात निघालेल्या पोलिस पथकासोबत त्याचा काकाही होता. त्यांनी जंगलात हाक मारली तेव्हा सेरिनने आवाज ओळखला. प्रतिसाद देत तो पळत आला आणि काकाला बिलगला. अशा तणावातही त्याने विचारले, ‘काका, माझी खेळणीतील कार सुरक्षित आहे ना?’ तो म्हणाला, ‘माझ्या खिशात काही चॉकलेट होते. पहिल्या दिवशीच ते मी खाल्ले होते. रात्री झाडाखाली झोपलो होतो...’ सेरिन रशियातील तुवा भागात असलेल्या खूट गावचा रहिवासी आहे. पाळीव श्वानाचा पाठलाग करताना तो जंगलात हरवला होता. पपी तर परतला, परंतु सेरिन परतलाच नाही. त्याला शोधण्यासाठी पोलिसांनी बचाव अभियानच राबवले. या कार्यात हेलिकॉप्टरचीही मदत घेतली जात होती. अगदी कडाक्याच्या थंडीत शून्याखाली तापमान असताना पोलिसांनी सुमारे १२० चौरस किमी क्षेत्रात त्याचा शोध घेतला. स्थानिक पोलिस अधिकारी अयास सारयगलर यांनी सांगितले, हे जंगल खूपच भयंकर आहे. येथे लांडगे आणि अस्वलांची संख्या खूप आहे. अस्वले तर थंडीत अगदी मौज करतात. दिसेल त्या प्राण्यांवर हल्ले करतात. दिवसा थोडी ऊब असते, परंतु रात्र गारठून टाकते. विशेष म्हणजे सेरिनच्या पायात तर बूट नव्हते ना कोट. फक्त एक हाफ शर्ट होता. जंगलातून मायनास नदी वाहते. या नदीत पडला असता तर मात्र तो सापडणेच कठीण होते.
बातम्या आणखी आहेत...