आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सौदी अरेबियामध्ये 11 राजपुत्रांसह अनेक मंत्र्यांना अटक; भ्रष्टाचाराविरोधात कारवाई

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रियाध- सौदी अरेबियात ११ राजपुत्र तसेच अनेक आजी-माजी मंत्र्यांना अटक करण्यात आली आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपावरून ही कारवाई करण्यात आल्याचे वृत्त आहे. सौदी अरेबियाचे युवराज मोहंमद बिन सलमान यांनी ही कारवाई करून आपले सिंहासन भक्कम केल्याचे म्हटले जात आहे. या सर्वांची बँक खाती सील करण्यात आली आहेत. 

सौदी अरेबियाच्या नॅशनल गार्डचे प्रमुख युवराज मितेब बिन अब्दुल्लाह, नौदल प्रमुख आणि अर्थमंत्री यांचीही पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. युवराज मोहंमद बिन सलमान यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी भ्रष्टाचारविरोधी आयोगाची स्थापना करण्यात आली होती. त्यानंतर लगेच ही कारवाई करण्यात आली. अटक झालेल्यांत सौदीचे अब्जाधीश युवराज अल-वालीद बिन तलाल यांचाही समावेश आहे, असे वृत्त न्यूज वेबसाइटने दिले आहे.  मात्र, त्याला अधिकृत दुजोरा मिळाला नाही. युवराज अल-वालीद यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही. युवराज मितेब बिन अब्दुल्लाह यांची पदावरून हकालपट्टी करून युवराज मोहंमद बिन सलीम यांनी देशाच्या सुरक्षा संस्थांवरील आपली पकड आणखी भक्कम केली आहे.  

सौदी सरकारच्या मालकीच्या अल अरेबिया टेलिव्हिजनच्या वृत्तानुसार, ११ राजपुत्र, चार विद्यमान मंत्री आणि अनेक माजी मंत्र्यांना अटक करण्यात आली आहे. भ्रष्टाचारविरोधी आयोगाने काही जुन्या प्रकरणांची चौकशी सुरू केली आहे. त्यात २००९ मध्ये जेद्दाहमध्ये आलेल्या पुराचाही समावेश आहे. सौदी सरकारच्या मालकीच्या वृत्तसंस्थेने म्हटले आहे की, सार्वजनिक पैशाचे संरक्षण करणे आणि भ्रष्ट लोक तसेच आपल्या पदाचा दुरुपयोग करणाऱ्यांना शिक्षा देणे हे भ्रष्टाचारविरोधी आयोगाचे उद्दिष्ट आहे. उच्च पदावरील कोणतीही व्यक्ती देश सोडून बाहेर जाऊ नये म्हणून सुरक्षा दलांनी जेद्दाहमध्ये खासगी विमाने तैनात केली आहेत, अशी माहिती नागरी उड्डयन मंत्रालयाच्या सूत्रांनी दिली.  
 
 
युवराजांच्या धोरणांना विरोध असल्यानेच कारवाई  
 
युवराज मोहंमद बिन सलीम यांनी दोन आठवड्यांपूर्वी रियाधमधील गंुंतवणूक परिषदेत जागतिक व्यावसायिकांना गुंतवणुकीसाठी निमंत्रित केले होते. त्यांचे हे पाऊल आर्थिक सुधारणांकडे जाणारे आहे, असे म्हटले जात होते. त्याचप्रमाणे युवराजांनी आक्रमक परराष्ट्र धोरणाचा अवलंब केला होता. त्यात कतारवर बहिष्कार टाकण्याचा समावेश होता. त्यांनी सार्वजनिक मालमत्तेचे खासगीकरण करणे आणि अनुदानात कपातीचे धोरणही अवलंबले होते. अटक करण्यात आलेल्यांपैकी अनेक जणांचा या धोरणांना विरोध होता, असे मत विश्लेषक व्यक्त करत आहेत.
 
धार्मिक परिषदेचीही कारवाईला मान्यता   
भ्रष्टाचाराच्या विरोधातील लढा हा दहशतवादाच्या विरोधातील लढ्याएवढाच महत्त्वाचा आहे, अशी प्रतिक्रिया सौदी अरेबियाच्या धर्मगुरूंच्या परिषदेने व्यक्त केली आहे. त्यामुळे या कारवाईला धार्मिक परिषदेचीही मान्यता आहे, असे म्हटले जात आहे.  
बातम्या आणखी आहेत...