आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यूएईसाठी गुंतवणुकीच्या दृष्टीने भारत सुरक्षित स्थान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अबूधाबी - पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी वाळवंटातील स्वर्ग म्हणून जगभर ओळख असलेल्या संयुक्त अरब-अमिरातीत (यूएई) दाखल झाले. दोन दिवसांच्या या दौऱ्यात मोदी अबूधाबी आणि दुबईचा दौरा करतील. भारतात ज्या गतीने आर्थिक सुधारणा सुरू आहेत त्या पाहता यूएईच्या दृष्टीने भारत गुंतवणुकीसाठी एक आकर्षक व सुरक्षित स्थान ठरू शकतो, असे मोदी यांनी येथे सांगितले.
अबुधाबी विमानतळावर अमिरातीचे युवराज तसेच लष्कराचे उपप्रमुख शेख मुहम्मद बिन जय्यद अल नाहयान यांनी मोदींचे जोरदार स्वागत केले. युवराजांच्या निमंत्रणावरूनच मोदींचा हा दौरा आयोजित करण्यात आला आहे. मोदींनी यूएईचे उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान शेख मुहम्मद बिन रशीद अल मकतूम यांची भेट घेतली.

यूएई तर मिनी इंडिया : मोदी यांनी यूएई म्हणजे मिनी इंडिया असल्याचे नमूद करून या देशाबद्दल आपल्याला मनस्वी प्रेम असल्याचे सांगितले. या देशाकडे कौशल्ये व दूरदृष्टी असल्याचेही त्यांनी नमूद केले. केवळ दहशतवादविराेधी लढ्यातच नव्हे तर व्यापार व गुंतवणुकीच्या क्षेत्रातही भारत या देशाला प्रमुख भागीदार बनवू इच्छितो, असे मोदी म्हणाले. तत्पूर्वी "खलिज टाइम्स'ला मोदी यांनी एक मुलाखत दिली. ही मुलाखत नंतर टि्वटर अकाउंटवरही प्रसिद्ध करण्यात आली आहे. मोदी म्हणाले, येथील २६ लाख भारतीय मायदेशीच्या भाषाच बोलतात. त्यांनी यूएईचे भारताशी नाते घट्ट केले आहे. यूएईच्या विकासातच नव्हे तर भारताच्या आर्थिक प्रगतीतही या भारतीय समुदायाचे मोठे योगदान आहे.
पेंटिंग प्रदर्शनास नकार
दुबईत राहणारे प्रसिद्ध भारतीय चित्रकार अकबर सईद यांनी मोदींच्या जीवनावर अाधारित काढलेल्या चित्रांचे प्रदर्शन भरवण्याची परवानगी भारतीय वकिलातीने नाकारली. राजदूत टी. पी. सीताराम म्हणाले, सध्या असे प्रदर्शन भरवले जाण्याची शक्यता दिसत नाही. चित्रकार अकबर कर्नाटकातील रहिवासी असून ३८ वर्षांपासून ते या क्षेत्रात आहेत. मोदींसाठी त्यांनी खास चित्रे काढली असून जॉर्ज बुश व बराक ओबामांसाठीही त्यांनी अशा खास पेंटिंग्ज तयार केल्या होत्या.

आज दोन सार्वजनिक कार्यक्रम
मोदी सोमवारी दुबईमध्ये दोन सार्वजनिक कार्यक्रमांत सहभागी होत आहेत. दुबई क्रिकेट स्टेडियममध्ये ते प्रवासी भारतीयांशी संवाद साधतील. यात सुमारे ५० हजार लोक सहभागी होण्याची शक्यता आहे.
३४ वर्षांनंतर पंतप्रधान यूएईत
भारतीय पंतप्रधानांचा ३४ वर्षांनंतरचा हा यूएई दौरा आहे. यापूर्वी १९८१ मध्ये इंदिरा गांधी दौऱ्यावर आल्या होत्या. सोमवारी मोदी दुबईला रवाना होतील. त्यांच्या समवेत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, परराष्ट्र सचिव एस. जयशंकर आदी असतील.