आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • India Pak Become Member Of Shangai Cooperation Council Next Year

भारत-पाक शांघाय सहकार्य परिषदेचे सदस्य पुढील वर्षी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उफा (रशिया) - भारत आणि पाकिस्तानला शांघाय सहकार्य परिषदेचे (एससीआे) सदस्यत्व बुधवारी नव्हे, तर पुढच्या वर्षी देण्यात येणार आहे. यासंबंधीची अधिकृत घोषणा बुधवारी होण्याची शक्यता आहे. ही माहिती रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांचे सहायक युरी उशाकोव यांनी मंगळवारी एका टीव्ही मुलाखतीत दिली.

रोसिया-२४ या वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत उशाकोव म्हणाले, ‘एससीआेच्या बैठकीत भारत व पाकिस्तानला सदस्यत्व देण्यावर सहमती झाली आहे. ही प्रक्रिया गुरुवारपासून सुरू होणा-या परिषदेत होईल. दोन्ही देशांच्या सदस्यत्वाला अंतिम रूप २०१६ मध्ये भारतात होणा-या परिषदेदरम्यान देण्यात येईल. त्यापूर्वी दोन्ही देश सहकार्य करार व २८ प्रमुख दस्तऐवजांवर स्वाक्ष-या करतील. एससीआे राजकीय, आर्थिक आणि लष्करी गठबंधन आहे. रशिया, चीन, कझाकिस्तान, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तान ही सदस्य राष्ट्रे आहेत. भारत व पाक सध्या एससीआेचे पर्यवेक्षक सदस्य आहेत. अफगाणिस्तान, इराण, मंगोलिया याचे इतर पर्यवेक्षक आहेत. भारत-पाकिस्तानला सदस्यत्व देण्यासाठी एससीआेने सप्टेंबर २०१४ च्या दुशांबे संमेलनात प्रस्ताव मंजूर केला होता.

कझाकिस्तानात मोदींनी मांडली भूमिका
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मध्य अाशिया दौ-याचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. मंगळवारी मोदी उझबेकिस्तानातून कझाकिस्तानला रवाना झाले. राजधानी अष्टाना विमानतळावर पंतप्रधान करीम मॅसिमोव यांनी त्यांचे स्वागत केले. मोदींनी इंग्रजी व कझाकी भाषेत ट्विट केले. कझाकिस्तानाच्या भेटीचा आनंद आहे. मध्य अाशियातील हा भारताचा विश्वासू मित्र आहे. शानदार स्वागतासाठी मी पंतप्रधान करीम मॅसिमोव यांना धन्यवाद देतो, असे ट्विट मोदींनी केले. कझाकिस्तानात मोदी २ दिवस राहतील. राष्ट्रपती नूर सुलतान नजरबायेव यांची ते भेट घेतील. येथील नजरबायेव विद्यापीठात त्यांच्या भाषणाचे आयोजन करण्यात आले होते. आपल्या अर्ध्या तासाच्या भाषणात त्यांनी भारताची भूमिका स्पष्ट केली. भारत -मध्य अाशियातील इस्लामिक वारशाने दहशवादाला नाकारल्याचे ते म्हणाले. मध्य अशिया-भारत संरक्षण संबंधाच्या दृढीकरणाचे त्यांनी समर्थन केले.

नरेंद्र माेदी- नवाज शरीफ भेटीची शक्यता
मोदी बुधवारी रशियाच्या उफा शहरात दाखल होतील. एससीआे संमेलनात प्रथमच भारताच्या प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व पंतप्रधान करत आहेत. पाकिस्तानी प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्वही शरीफ करणार आहेत. उफा शहरात मोदी-शरीफ भेटीची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

लालबहादूर शास्त्रींना ताश्कंदमध्ये श्रद्धांजली
अष्टानाला रवाना होण्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी उझबेकिस्तानातील ताश्कंद शहरात माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्रींच्या प्रतिमेला श्रद्धांजली अर्पण केली. १९६६ मध्ये शास्त्रीजींचा ताश्कंद येथे मृत्यू झाला होता. १९६५ मध्ये भारत-पाक युद्धानंतर शांती प्रस्तावावर चर्चेसाठी शास्त्रीजी येथे आले होते. उझबेक रेडिआेच्या हिंदी सेवेला ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल मोदींनी रेडिआेचे अभिनंदन केले.

ब्रिक्स राष्ट्रांचे संमेलन रशियातच हाेणार
ब्रिक्स राष्ट्रांचे शिखर संमलेनही उफा शहरातच होणार आहे. सदस्य ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिकेचे नेते प्रामुख्याने आर्थिक सहकार्यावर चर्चा करतील. ब्रिक्स बँकेची स्थापना झाली आहे. भारतीय बँकर के. व्ही. कामथ याचे पहिले प्रमुख आहेत.