आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीलंकेत कोहली ब्रिगेडची आजपासून

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गाले - भारत आणि यजमान श्रीलंका यांच्यातील तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिली लढत बुधवारपासून सुरू होत आहे. भारतीय संघापुढे विरोधी संघाचे आव्हान, चाहत्यांच्या अपेक्षा आणि दबावाशी दोन हात करण्याचे आव्हान असेल. टीम इंडिया श्रीलंकेत विजयी सुरुवात करण्याच्या इराद्याने मैदानावर उतरेल.
भारतीय संघासाठी ही कसोटी मालिका महत्त्वपूर्ण आहे. कारण या मालिकेत कर्णधार विराट कोहलीसह भारतीय संघातील जवळपास १० खेळाडूंसाठी श्रीलंकेच्या भूमीवर पहिला कसोटी सामना ठरेल. याशिवाय विदेशी भूमीवर कसोटीत भारताचा रेकॉर्ड अत्यंत सुमार राहिला आहे. शिवाय श्रीलंकेत २२ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर कसोटी मालिका जिंकण्याचा दबाव भारतावर असेल.

संगकाराची निरोप मालिका
श्रीलंकेचा दिग्गज क्रिकेटपटू कुमार संगकारासाठी ही कसोटी मालिका कारकीर्दीतील अखेरची ठरणार आहे. या मालिकेतील दोन सामन्यांनंतर तो निवृत्त होत आहे. यामुळे यजमान संघ संगकाराला विजयी निरोप देण्यासाठी जोरदार प्रयत्न करेल, यात शंका नाही.

कोहलीपुढे आव्हान
भारतीय संघ तब्बल पाच वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर श्रीलंकेत खेळत आहे. सध्याच्या टीम इंडियात १५ पैकी ११ खेळाडू असे आहेत, जे पहिल्यांदा श्रीलंकेत खेळतील. यात विराटचासुद्धा समावेश आहे. कोहलीने श्रीलंकेत कधीही कसोटी सामना खेळला नाही. अशात युवा आणि कमी अनुभव असलेल्या संघाचे नेतृत्व करण्याचे आव्हान कोहलीसमोर असेल.

18 कसोटी सामने दोन्ही देशांनी श्रीलंकेत खेळले
04 मध्ये टीम इंडिया विजयी
06मध्ये श्रीलंकेने मारली बाजी
08सामने दोन्ही देशांत
झाले ड्रॉ

चार खेळाडूंकडे अनुभव
भारतीय संघातील मुरली विजय, हरभजन सिंग, ईशांत शर्मा आणि अमित मिश्रा यांना श्रीलंकेत कसोटी खेळण्याचा अनुभव अाहे. मात्र, मुरली विजय दुखापतीमुळे संघाबाहेर झाल्याने प्लेइंग इलेव्हनमधील एक अनुभवी खेळाडू कमी झाला आहे. यामुळे शिखर धवन, अजिंक्य रहाणे, लोकेश राहुल, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहली यांच्यावर फलंदाजीची भिस्त आहे.

या खेळाडूंवर असेल मदार
१. विराट कोहली : कसोटीत आतापर्यंत १० शतके ठोकली आहेत.
२. अजिंक्य रहाणे : श्रीलंका अध्यक्षीय संघाविरुद्ध शतक ठोकले.
३. शिखर धवन : नुकत्याच झालेल्या बांगलादेशविरुद्ध कसोटीत १७३ धावा.
४. ईशांत शर्मा : श्रीलंका अध्यक्षीय संघाविरुद्ध डावात ५ विकेट घेतल्या.
५. आर. अश्विन : श्रीलंका अध्यक्षीय संघाविरुद्ध सामन्यात ५ विकेट.
६. हरभजनसिंग : ४०० विकेट घेणारा भारताचा ऑफस्पिनर. अनुभवाचा फायदा शक्य.

लोकेश-शिखर खेळणार सलामीला : ऑस्ट्रेलिया दौऱ्यात सुमार कामगिरीमुळे लोकेश राहुलला संघाबाहेर बसावे लागले होते. त्या वेळी लोकेश राहुलला संधी मिळाली होती. त्याने एक शतकही (११० धावा) ठोकले होते. राहुल आता शिखर धवनसोबत सलामीला खेळेल.

फिरकीचे त्रिकूट : हरभजनसिंग, आर. अश्विन आणि अमित मिश्रा या तिघांना पहिल्या कसोटीत संधी मिळू शकते. रवी शास्त्री आणि विराट कोहली दोघांनी पाच गोलंदाजांना अंितम अकरामध्ये खेळवण्याची घोषणा केली आहे.

दोन्ही संभाव्य संघ असे
भारत : विराट कोहली (कर्णधार), लोकेश राहुल, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, वृद्धिमान साहा, आर. अश्विन, हरभजन िसंग, अमित मिश्रा, ईशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, वरुण अॅरोन, मुरली विजय.
श्रीलंका : अँज्लो मॅथ्यूज (कर्णधार), थिरिमाने, चमिरा, दिनेश चांदिमल, कुमार संगकारा, एन. प्रदीप, व्ही. फर्नांडो, रंगना हेराथ, डी. करुणारत्ने, थिरांडू कौशल, जे. मुबारक, डी. परेरा, कुशल परेरा, धमिका प्रसाद,
उपुल थरंगा.