आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रशियात भारतीय खाद्यपदार्थांवर ताव, लोकप्रियतेत वाढ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मॉस्को - तंदुरी चिकन असो की मटण बर्रा, पनीर मलाई कोफ्ता किंवा सरसो दा साग हा पंजाबी पदार्थ. रशियाच्या राजधानीतील खाऊ गल्लीतील भारतीय रेस्तराँ हाऊसफुल्ल आहेत. चटकदार आणि लज्जतदार भारतीय पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी रशियन खवय्यांचे पाय इकडे आपसूकच वळतात.

मॉस्कोत भारतीय पदार्थांची चव चाखण्याची संधी देणारे १० रेस्तराँ आहेत. त्यात उत्तर भारतीय, दक्षिण भारतीय पदार्थांची रेलचेल पाहायला मिळते. त्यामुळे विविध पदार्थांचा भरपेट आस्वाद घेण्यासाठी रशियन नागरिकही मागे दिसत नाहीत. ‘डिझे हिंद’, ‘दारबरज’, ‘खजुराहो’, ‘देवी कॅफे’, ‘जगन्नाथ’ इत्यादी रेस्तराँची नावे लक्ष वेधून घेतात. केवळ मॉस्कोमध्येच नव्हे, तर रशियाच्या इतर शहरांतही भारतीय व्यंजनांना खवय्यांकडून माेठी मागणी आहे. आम्ही सर्व देशांतील नागरिकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करतो, परंतु खवय्यांकडून मात्र भारतीय पदार्थांची मागणी केली जाते, अशी माहिती देवी कॅफेच्या अधिकाऱ्यांनी सांगितली. आमच्याकडे येणाऱ्या पाहुण्यांपैकी ६०-७० टक्के रशियन असतात. ते भारतीय पदार्थांची मागणी करतात. राजधानीत लंच किंवा डिनरसाठी दोन व्यक्तींसाठी सुमारे १ ते दीड हजार रुपये मोजावे लागतात.

ढाब्याची आठवण
भारतात महामार्गांच्या शेजारी असलेल्या ढाब्याप्रमाणे वातावरण असलेल्या काही रेस्तराँना रशियन नागरिक पसंती देतात. खवय्यांना खाद्यपदार्थांबरोबर भारतीय माहोलदेखील आवडतो, असे रेस्तराँच्या एका कर्मचाऱ्याने सांगितले.

मेनू लोकप्रियतेचा
नॉन व्हेज : मटण हैदराबादी, हिरवी चटणी (हैदराबादी), मटण जालफ्रेझी, मुर्ग मसाला, मटण बिर्याणी, चिकन करी, रायता, फिश डिशेस.
व्हेज डिशेस : हरयाली शोर्बा, दाल अमृतसरी, सरसो दा साग.

मसालेदार पदार्थ लोकप्रिय
मॉस्कोसह इतर शहरांतही भारतीय मसालेदार पदार्थांना अधिक मागणी आहे. रशियातील सर्व वयोगटातील खवय्यांकडून ते पसंत केले जातात.
-रामेश्वर सिंग, अध्यक्ष, ‘दिशा’, रशियन-इंडियन फ्रेंडशिप सोसायटी, मॉस्को.

महिन्यातून दोनदा भेट देतो
भारतीय पदार्थ मसालेदार असतात. आम्हाला ते खूप आवडतात. म्हणून मी आणि माझी बायको आम्ही महिन्यातून दोन वेळा तरी भारतीय रेस्तराँला आवर्जून भेट देतो.
-रेझनोव्ह, खवय्या.
बातम्या आणखी आहेत...