आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

द. आफ्रिकेच्या अर्थमंत्रिपदी भारतीय वंशाचे प्रवीण गोर्धन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जोहान्सबर्ग - दक्षिण आफ्रिकेतील आठवडाभर चाललेल्या आर्थिक उलथापालथीनंतर राष्ट्राध्यक्ष जेकब झुमा यांनी भारतीय वंशाचे प्रतिष्ठित राजकीय नेते प्रवीण गोर्धन यांची देशाच्या अर्थमंत्री पदावर नेमणूक केली आहे. हा निर्णय वादाचा ठरला आहे.

झुमा यांनी बुधवारी न्हालान्हाला निनी यांची बदली केली होती. त्याचे कारण स्पष्ट करण्यात आले नव्हते; परंतु त्यानंतर देशभरातून झुमा यांच्या निर्णयावर जोरदार टीका होत होती. त्या पार्श्वभूमीवर झुमा यांनी शनिवारी रात्री गोर्धन यांच्या नावाची घोषणा केली. ६६ वर्षीय गोर्धन यांच्या नावाच्या घोषणेमागील कारणही अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही. लोकशाहीमध्ये लोकांचे म्हणणे ऐकणे आणि त्याला योग्य प्रतिसाद देणे अपेक्षित आहे. तेच आम्ही करण्याचा प्रयत्न केला आहे, असे झुमा यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे. दरम्यान आफ्रिका खंडातील नायजेरियानंतर दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था म्हणून दक्षिण आफ्रिकेची आेळख आहे.

अर्थव्यवस्थेला स्थिर करण्याचे आव्हान
गोर्धन यांच्या नियुक्तीला सरकारी पातळीवर खूप महत्त्व आले आहे. जागतिक पतमानांकनात झालेली घसरण आणि डळमळीत झालेल्या अर्थव्यवस्थेला स्थिर करण्याचे आव्हान गोर्धन यांच्यासमोर आहे. आर्थिक क्षेत्रात दक्षिण आफ्रिकेला बळकटी मिळावी या उद्देशाने झुमा यांच्या निर्णयाकडे पाहिले जाते.
अगोदर चांगली कामगिरी
गोर्धन यांनी या अगोदरही दक्षिण आफ्रिकेचे अर्थ खाते सांभाळले होते. २००९-१४ या दरम्यान गोर्धन यांनी हे पद यशस्वी सांभाळले होते. त्या वेळी त्यांच्या कारभाराचे आंतरराष्ट्रीय स्तरावरही कौतुक झाले होते. सरकारचा अवास्तव खर्च आणि उत्पन्न यांचा मेळ बसवण्यासाठी गोर्धन यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक शिस्त लावावी लागणार आहे.
रोजगारवाढीची अपेक्षा
दक्षिण आफ्रिकेतील बेरोजगारी ही सरकारसमोरील भीषण समस्या आहे. त्यातून अनेक समस्यांचा जन्म झाला आहे. आर्थिक तसेच सामाजिक प्रश्नही त्यातून निर्माण झाले आहेत. म्हणूनच गोर्धन यांच्या धोरणातून देशात रोजगार वाढेल. विकासाचा मार्ग सापडेल, अशी अपेक्षाही सरकारला वाटते. म्हणूनच गेल्या काही दिवसांत अर्थमंत्र्यासारख्या महत्त्वाच्या पदाबाबत हा निर्णय झाला. गोर्धन आपले नेतृत्व सिद्ध करतील, असे जाणकारांना वाटते.
पत घसरल्याचे स्पष्ट
पत मूल्यांकन करणाऱ्या फिच या संस्थेने ४ डिसेंबर रोजी देशाच्या मानांकनात घसरण झाल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या आर्थिक वाटचालीला मोठा धक्का बसल्याचे मानले जाते. त्यामुळे झुमा यांनी बुधवारी निनी यांना पदावरून हटवण्याचा वादग्रस्त निर्णय घ्यावा लागला.
बातम्या आणखी आहेत...