आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष: भारतीय वंशाच्या सुनीताची मंगळावर स्वारी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - भारतीय वंशाची अंतराळवीर सुनीता विल्यम्सच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला जाणार आहे. अमेरिकी अंतराळ संस्था नासाने आपल्या पहिल्या व्यावसायिक अंतराळ सफर मोहिमेसाठी निवडलेल्या चार अंतराळवीरांत सुनीताचाही समावेश केला आहे. हा चमू मंगळावर मानव पाठवण्याच्या महत्त्वाकांक्षी मोहिमेचाही भाग राहणार आहे.

अमेरिकेकडून लोकांना अंतराळाचा प्रवास घडवण्याच्या योजनेसाठी या चार अंतराळावीरांना व्यावसायिक अंतराळयान चालवण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. सध्या हे चौघेही बोइंग आणि स्पेस एक्स कंपनीसोबत अंतराळयान विकसित करण्याच्या दिशेने काम करत आहेत. २०३० पर्यंत मानवाला मंगळावर पाठवण्याशी निगडित महत्त्वाकांक्षी प्रकल्पाशी ही टीम जुळलेली असेल.

इतिहासात नाव कोरले जाणार
नासाचे प्रशासक चार्ल्स बोल्डन म्हणाले, आम्ही २०३० पर्यंत अंतराळवीरांना मंगळावर पाठवण्याचे ध्येय साध्य करण्याच्या दिशने काम करत आहोत. ही मोहीम या प्रख्यात अंतराळवीरांना एके दिवशी इतिहासाच्या पुस्तकात तर अमेरिकी लोकांना मंगळ ग्रहाच्या धरतीवर स्थान मिळवून देईल.

सुनीताचे पूर्वज गुजरातच्या मेहसणाचे
सुनीता विल्यम्स अमेरिकेची नौदल कॅप्टन आहे. १९९८ मध्ये नासासाठी निवड होण्याआधी तिला ३० पेक्षा जास्त वेगवेगळ्या हेलिकॉप्टरद्वारे तीन हजार तासांपेक्षा जास्त उड्डाणांचा अनुभव होता. तिचे पूर्वज गुजरातच्या मेहसाणा जिल्ह्यातील झुलासणमध्ये राहत होते. लग्नाआधी तिचे नाव सुनीता पंड्या होते. ९ डिसेंबर २००६ राेजी ती पहिल्यांदा अंतराळात गेली. आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात पाठवलेल्या १४ व्या शटल डिस्कव्हरीसोबत तिला रवाना करण्यात आले होते. आपल्यासोबत तिने भगवद‌्गीता नेली होती.

सुनिताच्या नावावरील विक्रम : सुनीताने अंतराळात तब्बल ३२२ दिवस घालवले आहेत. महिला अंतराळवीर म्हणून तिच्या नावे एकूण ५० तास ४० मिनिटांचा सर्वाधिक स्पेसवाॅकचाही विक्रम आहे.