आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indian President Pranab Mukherjee Arrives In Papua New Guinea

पापुआ न्यू गिनीशी भारत करणार आरोग्य करार; राष्ट्रपतींच्या दौरा सुरु

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पोर्ट मॉरेस्बी- राष्ट्रपती प्रणव मुखर्जी प्रशांत महासागरातील पापुआ न्यू गिनी आणि न्यूझीलंडच्या दिवसीय दौऱ्यावर रवाना झाले. गुरुवारी ते पापुआ गिनीत दाखल झाले. पापुआ गिनीसोबत देशाचा महत्त्वपूर्ण आरोग्यविषयक करार होणार आहेत. त्यामुळे भारतीय फार्मा कंपन्यांसाठी नवा मार्ग खुला होईल.

मुखर्जी यांचे गुरुवारी सकाळी राजधानीत आगमन झाल्यानंतर त्यांचे उपपंतप्रधान लिआे डिआेन यांनी स्वागत केले. या वेळी त्यांना २१ तोफांची सलामीही देण्यात आली. १९७५ मध्ये भारत आणि पापुआ न्यू गिनी यांच्यात सामरिक संबंधाला सुरुवात झाली होती. त्यानंतर या देशाला भेट देणारे ते पहिलेच राष्ट्रप्रमुख ठरले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नवीन लूक ईस्ट धोरणानुसार या दौऱ्याकडे सरकार पाहते. भारताला सदृढ अशा बाजारपेठेत प्रवेश करण्याची इच्छा आहे. त्यादृष्टीने पापुआ न्यू गिनी हा बेटावरील देश भारताला महत्त्वाचा वाटतो. दोन्ही देशांत आरोग्य, वैद्यकीय यासारख्या पायाभूत क्षेत्रांत मदतीचा करार होणार आहे. त्याला सरकारने परवानगी दिली आहे. राष्ट्रपतींच्या उपस्थितीत त्यावर शिक्कामोर्तब होईल. त्यामुळे उभय देशांतील संबंध नव्या उंचीवर पोहाेचतील, असा विश्वास सरकारी अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. दोन्ही देशांत आरोग्य करार होणार असल्याने भारतातील फार्मास्युटिकल्स कंपन्यांना आपले नवीन प्रकल्प गिनीमध्ये सुरू करण्याची संधी मिळणार आहे. त्यातून नवीन बाजारपेठ भारताला मिळण्याचा मार्ग खुला होणार आहे. सुमारे ७० लाख एवढी लोकसंख्या असलेल्या छोट्या देशात एचआयव्हीसारखे अनेक आजारांची समस्या पाहायला मिळते. अशा परिस्थितीत भारताची गिनीला मदत होणार आहे.

चीनला थोपवण्यासाठी फायदेशीर
प्रशांतमहासागरातील बेटावरील देशांवर चीनचा प्रभाव वाढू लागला आहे. हा प्रभाव कमी करण्याच्या दृष्टीने भारताची ही मुत्सद्देगिरी महत्त्वाची मानली जात आहे. त्यामुळे चीनला थोपवणे शक्य होणार आहे.

३० एप्रिलपासून न्यूझीलंड
राष्ट्रपती मुखर्जी पापुआ न्यू गिनीतील दौरा आटोपून ३० एप्रिलपासून ते न्यूझीलंडच्या भेटीवर जातील. कृषी, दुग्धजन्य पदार्थ, अन्न प्रक्रिया, शिक्षण, कौशल्य विकास, उच्च तंत्रज्ञान या क्षेत्रात भारत-न्यूझीलंडमध्ये सामंजस्य करार होणार आहेत. न्यूझीलंडचे पंतप्रधान जॉन की यांनी २०११ मध्ये भारताला भेट दिली होती. त्याशिवाय न्यूझीलंडचे गव्हर्नर २००८, २००९, २०११ मध्ये भेटीवर आले होते. अगोदर १९८६ मध्ये तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी न्यूझीलंडचा दौरा केला होता. तेव्हापासून भारत-न्यूझीलंड यांच्यात होणारी ही पहिलीच उच्चस्तरीय चर्चा ठरणार आहे.