आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीयांची मते ब्रिटनच्या निवडणुकीत निर्णायक, गुरुवारी मतदान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बाथमध्ये एका सभेदरम्यान लोकांना भेटताना कॅमेरॉन व पत्नी सामंथा
लंडन - ब्रिटनमध्ये ७ मे रोजी होणा-या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय वंशाच्या मतदारांची निर्णायक भूमिका असेल, असे जाणकारांचे मत आहे. ब्रिटनमध्ये परदेशी वंशाच्या नागरिकांमध्ये भारतीयांची संख्या सर्वाधिक आहे. या निवडणुकीत कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणार नसल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

लिबरल आणि कन्झर्व्हेटिव्ह सत्ताधारी आघाडीचे नेते आणि विरोधी पक्ष लेबर पार्टी निवडणूक जिंकण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत आहे. ब्रिटनच्या संसदेत खासदारांची सदस्य संख्या ६५० असून बहुमतासाठी ३२६ आकडा पार करणे आवश्यक आहे. २०१० च्या निवडणुकीतही त्रिशंकू स्थिती होती. टोरीजना ३०७ जागा तर लेबर पार्टीचे २५८ सदस्य निवडून आले होते. ५७ लिबरल डेमोक्रॅट्स व टोरीज यांनी एकत्र येऊन बहुमत प्राप्त केले होते. मात्र, या वेळी त्यांचा जनाधार घसरला आहे. त्रिशंकू अवस्थेमुळे निवडणुकीनंतर मोठ्या प्रमाणात घोडेबाजार होईल,अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

नेत्यांच्या गुरुद्वारा-मंदिरांना भेटी
भारतीय मतदारांना आकर्षित करण्यासाठी पंतप्रधान डेव्हिड कॅमेरॉन पत्नी सामंथासमवेत गुरुद्वारा,मंदिरांना भेटी देत आहेत. विरोधी पक्षाचे नेते एडवर्ड सॅमुएल मिलिबँड त्यांची पत्नी जस्टीन हे पण गुरुद्वारा,मंदिरात जात आहेत. ब्रिटनची अर्थव्यवस्था सशक्त करण्यात भारतीय वंशाच्या नागरिकांची महत्त्वपूर्ण भूमिका मानली जाते. त्यामुळे कंझर्व्हेटीव्ह आणि लेबर पार्टीचे नेते भारतीयांना आपलेसे करण्याच्या प्रयत्नात आहेत.

सहा लाख भारतीय मतदार
भारतीय मतदारांचा प्रभाव असलेल्या भागात लेबर पार्टीच्या १२, कन्झर्व्हेटिव्ह पक्षाच्या ६ आणि लिबरल डेमोक्रॅटच्या २ उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे. भारतीय वंशाच्या मतदारांची संख्या साधारण ६ लाख १५ हजार आहे. भारतीय वंशाचे नागरिक लेबर पार्टीचे पारंपरिक मतदार असल्याचे मानले जाते. मात्र, १९९७ मध्ये त्यांचा ७७ टक्के असणारा मतांचा वाटा २०१४ मध्ये केवळ १८ टक्के राहिला होता.