आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • India's Afghan Consulate Sees Fighters Repelled As Air Base Attack

भारतीय दूतावास हल्ला: तीन दहशतवाद्यांचा खात्मा, सर्व भारतीय सुखरूप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काबूल/ नवी दिल्ली- अफगाणिस्तानच्या मजार-ए- शरीफ शहरातील भारतीय वाणिज्य दूतावासावर हल्ला करणाऱ्या तीन दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी ठार केले. उर्वरित दोन अतिरेकीही मारले गेल्याची शक्यता आहे. मात्र, अद्यापही मोहीम सुरूच आहे. भारतीय दूतावासाच्या बचावासाठी बल्ख प्रांताचे गव्हर्नर अता मोहंमद नूर यांनी स्वत: बंदूक हाती घेतली. सोव्हिएत संघाने अफगाणमध्ये घुसखोरी केली होती तेव्हाही नूर लढाईत उतरले होते.

रविवारी रात्री ९ वाजून १५ मिनिटांच्या सुमारास अफगाण आणि भारत यांच्यात सॅफ स्पर्धेतील फुटबॉल सामना सुरू होता. प्रेक्षक तो पाहण्यात मग्न होते. याच संधीचा फायदा उचलत दहशतवाद्यांनी मजार-ए-शरीफमधील दूतावासावर हल्ला चढवला. मात्र, त्या ठिकाणी तैनात असलेल्या आयटीबीपीच्या (भारत-तिबेट सीमा पोलिस) ४८ कमांडोजनी अतिरेक्यांना आत घुसू दिले नाही.

काबूल विमानतळाजवळ बॉम्बस्फोट
>भारतीय दूतावासावरील हल्ल्याचे सावट ताजे असतानाच काबूलच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ एका आत्मघाती हल्लेखोराने बॉम्बस्फोट घडवून आणला. या हल्ल्यात कोणत्याही प्रकारच्या जीवितहानीचे वृत्त नाही. या हल्ल्यामागचे कारण स्पष्ट नाही.
>अफगाणिस्तानमध्ये भारताची महत्त्वाची पाच कार्यालये आहेत. त्यापैकी काबूलमध्ये मुख्य दूतावास आणि जलालाबाद, हेरात, कंदहार तसेच मजार-ए-शरीफमध्ये वाणिज्य दूतावास आहेत. सर्व कार्यालयांची सुरक्षा २००८ पासून वाढली आहे.

विशेष दलाचा लढा : अफगाण पोलिसांच्या विशेष दलाने ही कारवाई हाती घेतली असून आयटीबीपीच्या जवानांना राखीव ठेवण्यात आले आहे. या हल्ल्यात पाचमजली दूतावासाचे नुकसान झालेले नाही. मात्र, अतिरेकी दबा धरून बसलेल्या इमारतीला प्रचंड हानी पोहोचली आहे. अतिरेक्यांनी दूतावासावर किमान सात ग्रेनेड राउंडने हल्ले केले.

पाकमध्ये आयएसच्या ४२ हस्तकांना अटक
इस्लामाबाद- पाकिस्तानमध्ये इस्लामिक स्टेटशी संबंध ठेवल्याच्या संशयावरून ४२ अतिरेक्यांना पंजाब प्रांतात अटक करण्यात आली. दहशतवादविरोधी मोहिमेअंतर्गत अधिकाऱ्यांनी टाकलेल्या धाडीत ही कारवाई करण्यात आली. पंजाबचे कायदामंत्री राणा सनाउल्लाह म्हणाले, ४२ जणांना चार जिल्ह्यांतून उचलण्यात आले. अटक करण्यात आलेल्यांमध्ये आयएसचा वरिष्ठ हस्तक व इस्लामाबादचा प्रमुख अामिर मन्सूरचा समावेश आहे.