आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत-एनएसजीमध्ये चीनची भिंत आडवी, भारताचे सदस्यत्व लटकले!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सेऊल / नवी दिल्ली - अणुपुरवठादारांच्या समूहात (एनएसजी) प्रवेश मिळवण्याचे भारताचे तमाम प्रयत्न अपयशी ठरले आहेत. जगातील ४८ देशांचा समावेश असलेल्या या समूहात भारताला ३८ देशांचाच पाठिंबा मिळाला. पण चीनसह १० देशांचा विरोध चीनच्या भिंतीइतकाच आडवा आला. परिणामी निर्णय पुढच्या बैठकीपर्यंत लांबणीवर टाकण्यात आला.

दक्षिण कोरियाची राजधानी सेऊलमध्ये झालेल्या या बैठकीत भारताला बहुतांश देशांनी पाठिंबा दिला. अमेरिका, ब्रिटन, फ्रान्सने तर इतर देशांनीही भारताला पाठिंबा द्यावा, असे आवाहन केले. बैठकीत भारताच्या सदस्यत्वावर चर्चाही झाली. मात्र, चीनने अण्वस्त्र प्रसारबंदी (एनपीटी) कराराचे तुणतुणे वाजवत त्यात खोडा घातला. बैठकीनंतर परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी इशाऱ्यांतच सांगितले, एका देशाच्या (चीन) सतत विरोधामुळे भारताला यंदाही एनएसजीत स्थान मिळू शकले नाही. सूत्रांनुसार, चीनसह स्वित्झर्लंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रिया, तुर्की, आयर्लंड, ब्राझील, बेल्जियमने भारताच्या सदस्यत्वाला विरोध दर्शवला. दरम्यान, भारताला या सदस्यत्वासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे.

एनपीटीची चिंता
चिनी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते हुआ चुनयिंग म्हणाले, आमचा कोणत्याही देशाला विरोध नाही. आम्ही तर एनएसजीच्या नियमांबद्दलच बोलत आहोत. बिगर एनपीटी देशांना यात प्रवेश दिला जाऊ शकत नाही. असे झाल्यास एनपीटीचे अस्तित्वच धोक्यात येईल.

विशेष सवलत नाही : एनएसजीचे निवेदन
एनएसजीने निवेदनात म्हटले की, ज्यांनी एनपीटीवर स्वाक्षऱ्या केलेल्या नाहीत त्यांच्या समावेशाबद्दल आम्ही विचार करत राहू. मात्र, या प्रकरणात भारत वा इतर देशांना कोणतीही खास मुभा मिळणार नाही.
बातम्या आणखी आहेत...