आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indias Nuclear Programme Is Biggest Among The Developing Countries

विकसनशील देशांत भारताचा आण्विक कार्यक्रम सर्वांत मोठा, अमेरिकेतील थिंक टँकचा दावा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - विकसनशील राष्ट्रांमध्ये आण्विक कार्यक्रम राबवणाऱ्या देशांपैकी भारत हा सर्वांत मोठा देश असल्याचा दावा अमेरिकेतील एका थिंक टँकने केला आहे. या दाव्यानुसार, २०१४ च्या अखेरपर्यंत भारताकडे अण्वस्त्रे तयार करण्यासाठी लागणारे पुरेसे प्लुटोनियम असून या माध्यमातून भारत ७५ ते १२५ अण्वस्त्रांचा साठा करू शकतो.

भारताकडे असलेल्या प्लुटोनियमच्या साठ्यावरून या देशाकडे असलेल्या संभाव्य अण्वस्त्रांचा अंदाज लावता येऊ शकतो, असे या थिंक टँकचे म्हणणे आहे. इन्स्टिट्यूट फॉर सायन्स अँड इंटरनॅशनल सेक्युरिटीने यांसबंधीचा अहवाल सोमवारी प्रसिद्ध केला आहे. यात भारताकडे असलेल्या अण्वस्त्रांचा अंदाज मांडण्यात आला आहे.

डेव्हिड अलब्राईट आणि सेरेना केलेहर यांनी संयुक्तपणे तयार केलेल्या या अहवालात भारताकडील अण्वस्त्रांचा ठोकताळा मांडताना अनेक तर्क उपस्थित केले आहेत. यानुसार, भारताकडे असलेल्या प्लुटोनियमच्या माध्यमातून ९७ अण्वस्त्रे तयार केली जाऊ शकतात. त्यामुळे कमी-अधिक प्रमाणाचा विचार करता ७७ ते १२३ अण्वस्त्रे भारताकडे असू शकतात.

तेव्हा केला होता विरोध...
भारत-अमेरिकेदरम्यान नागरी आण्विक कराराच्या वेळी अलब्राईट यांनी जाहीर विरोध दर्शवला होता. भारताकडे नागरी व लष्करी उद्देशाने असलेल्या शुद्ध युरेनियमचा साठा किती आहे, याचा अंदाजही अहवालात आहे. त्यानुसार, २०१४ अखेरपर्यंत हा शुद्ध युरेनियमचा साठा पाहता विकसनशील राष्ट्रांमध्ये आण्विक कार्यक्रम पूर्ण क्षमतेने राबवणारा भारत सर्वांत मोठा व आघाडीवर असलेला देश आहे. आण्विक प्रकल्प व अण्वस्त्रनिर्मितीसाठी लागणारे प्लुटोनियम व युरेनियमच्या साठ्याबाबत भारतासारख्या देशावर पूर्ण विश्वास ठेवणे योग्य नसल्याचे थिंक टँकचे मत आहे. पाकिस्तानच्या तुलनेत भारताकडे अण्वस्त्रांचा साठा कमी असल्याचेही अहवालात नमूद आहे.

पुरावा नाही पण...
भारताने अण्वस्त्र निर्मितीसाठी शुद्ध युरेनियम (हायली एनरिचड् युरेनियम) तयार केले असल्याचा दावा या अहवालात असून या माध्यमातून मोठ्या प्रमाणात अण्वस्त्रांची निर्मिती केली जाऊ शकते, असा या थिंक टँकचा दावा आहे. यातून काही अणुऔष्णिक अस्त्रांची निर्मिती पण केली जाऊ शकते, अशी भीती या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.