आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indonesian Media Says 7 Foreign Drug Smugglers Executed

इंडोनेशियाने ऑस्ट्रेलियाच्या सात ड्रग्ज तस्करांना फासावर लटकवले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
किलाकॅप - अमली पदार्थ तस्करीत शिक्षा झालेल्या सात परदेशी तस्करांना इंडोनेशियामध्ये बुधवारी पहाटे मरेपर्यंत फाशी देण्यात आली आहे. त्यात ऑस्ट्रेलियाच्या दोन तस्करांचा समावेश आहे. नुसाकाम्बांगान बेटावरील तुरुंगात ही शिक्षा ठोठावण्यात आली. इंडोनेशियाच्या शिक्षेवरून आंतरराष्ट्रीय पातळीवर वादंग निर्माण झाले आहे.

इंडोनेशियाने अमली पदार्थ तस्करीच्या विरोधात युद्ध पुकारले आहे. त्याचाच एक भाग म्हणून सात दोषी परदेशींना फासावर लटकवण्यात आले आहे. देशाला वाचवण्यासाठी हा लढा सुरू आहे, असे इंडोनेशियाचे अॅटर्नी जनरल मोहंमद प्रासेटो यांनी पत्रकारांना सांगितले. फासावर लटकवण्यात आलेल्यांमध्ये दोन ऑस्ट्रेलियन, एक ब्राझीलियन, चार आफ्रिकन दोषींचा समावेश आहे. मृत्युदंडाची शिक्षा झालेल्यांमध्ये फिलिपाइन्सची महिला मेरी जेन वेलोसो हिचाही समावेश होता; परंतु अखेरच्या मिनिटाला तिची फाशी रद्द करण्यात आली. तिच्याकडे अमली पदार्थ आढळून आले होते. मृत्युदंड देण्यात कसलाही आनंद नाही; परंतु देशाच्या सुरक्षेसाठी आम्हाला ही गोष्ट करावीच लागली. आम्ही शत्रू कदापिही स्वीकारू शकत नाहीत. त्यांचा बीमोड केला तरच देश सुरक्षित राहू शकेल. आम्ही अशा प्रकारच्या गुन्हेगारीच्या विरोधात लढतच राहू, असे प्रासेटो यांनी स्पष्ट केले आहे.

राजदूत माघारी बोलावला : इंडोनेशियाने अमली पदार्थ तस्करी प्रकरणातील दोन तरुणांची सुटका करावी, अशी मागणी गेल्या अनेक महिन्यांपासून ऑस्ट्रेलियन सरकार तसेच दोषींच्या कुटुंबीयांकडून करण्यात येत होती. त्याकडे इंडोनेशियाने दुर्लक्ष केले होते. त्यामुळे नाराज ऑस्ट्रेलियाने तातडीने आपल्या राजदूताला मायदेशी माघारी येण्याचे आदेश दिले आहेत. उभय देशांतील संबंधावर त्याचा परिणाम झाला आहे, असे पंतप्रधान टोनी अबोट यांनी म्हटले आहे. इंडोनेशियाच्या सार्वभौमत्वाचा आम्ही आदर करतो.

गँग लीडर, २००६ मध्ये दोषी
आॅस्ट्रेलियाचे अँड्रयू चान आणि मयुरन सुकुमारन हे दोघे इंडाेनेशियात बाली नाइन नावाची हेरॉइन तस्करी गँग चालवत होते. त्यांना अटक झाल्यानंतर २००६ मध्ये दोघांना दोषी ठरवण्यात आले होते. दोघांसह इतर पाच परदेशी तस्करांनाही कोर्टाने दोषी ठरवले होते.

तात्पुरती प्रतिक्रिया
ऑस्ट्रेलियाने राजदूत माघारी बोलावण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु ही एक तात्पुरती प्रतिक्रिया आहे, अशा शब्दांत इंडोनेशियाच्या अॅटोर्नी जनरल यांनी आपली भूमिका मांडली.
फ्रान्सकडूनही इंडोनेशियाच्या कारवाईचा निषेध
पॅरिस - इंडोनेशियाने परदेशी सात तस्करांनी दिलेल्या शिक्षेचा फ्रान्सकडून निषेध करण्यात आला. कोणत्याही परिस्थितीत मृत्यूदंड देण्याच्या कृतीचा फ्रान्स निषेध करते, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रोमेन नडाल यांनी म्हटले आहे. दुसरीकडे फ्रान्सच्या एका नागरिकावर देखील इंडोनेशियात खटला चालू आहे. त्याला दोषी ठरवून मृत्यूदंड दिल्यास इंडोनेशियाला सामरिक पातळीवर ‘संकटांचा’ सामना करावा लागेल, असा इशारा अलीकडेच फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष फ्रान्कोइन आेलांद यांनी दिला होता.