आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IB चा अलर्ट : ISIS भारतात हल्ल्याच्या तयारीत, देशात 35 जेहादी सक्रिय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - इराक आणि सिरियाच्या अनेक भागांवर कब्जा मिळवल्यानंतर ISIS ही दहशतवादी संघटना भारतात हल्ले करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली आहे. गुप्तचर संस्था आयबी (इंटेलिजन्स ब्युरो) ने प्रथमच देशभरात ISIS च्या हल्ल्याचा अलर्ट जारी केला आहे. देशभरातील ISIS च्या 35 जेहादींची ओळख पटली असून ते मुंबई, चेन्नई, कोलकाता, बेंगळुरू, हैदराबाद अशा शहरांत सक्रिय आहेत.

गृहमंत्रालयाला सोपवली जेहादींची यादी
गुप्तचर संस्थेने देशात सक्रिय असलेल्या या जेहादींची यादी तयार करून त्यासंदर्भातील रिपोर्ट गृहमंत्रालयाकडे सोपवला आहे. या लोकांच्या हालचालींवर नजर ठेवण्यात येत आहे. या रिपोर्टनुसार हे लोक मेट्रो सिटीजमध्ये आयएसआयएसमध्ये भरती होण्यासाठी दहशतवादी गोळा करण्याची योजना आखत आहेत.

सर्व राज्यांच्या पोलिसांना अलर्ट
यापूर्वी आयबीने देशामध्ये ISIS चा प्रभाव असलेल्या देशातील दहशतवादी संघटनांबाबत इशारा दिला होता. आता या अलर्टनंतरही देशातील सर्व राज्यांच्या पोलिसांना अलर्ट देण्यात आला आहे. एजन्सीने देशातील सर्व एअरपोर्टवरील सुरक्षा संस्थांनाही इशारा दिला आहे.

आतापर्यंत 11 भारतीय गेले
आयबीने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या एका रिपोर्टमध्ये भारतातून एकूण 11 जण ISIS मध्ये सहभागी होण्यासाठी इराक आणि सिरियाला गेले असल्याचे म्हटले आहे. यात कल्याणच्या चार तरुणांसह भारतातील इतर सात जणांचा समावेश होता. यापैकी पाच भारतीयांचा संघर्षात मृत्यू झाल्याची माहितीही मिळाली आहे. तसेच कल्याणला राहणारा अरीब मजीद भारतात परतला असून तो NIA च्या कस्टडीमध्ये आहे. तर इतर पाच जण अजूनही ISIS सोबत आहेत.

तुर्कस्थान मिशनची सुरक्षा वाढवावी
अलर्टनुसार ISIS भारतात तुर्कस्थानच्या नागरिकांना किंवा त्यांच्या मिशनला लक्ष्य केले जाण्याची शक्यता आहे. एक जूनला जारी करण्यात आलेल्या अलर्टनुसार सिरियामध्ये ISIS अत्यंत वेगाने पाय पसरत आहे. त्याचा सर्वाधिक धोका तुर्कस्तानला आहे. जगातील अनेक देशांमध्ये तुर्कस्तानचे नागरिक आणि तुर्कस्तान मिशनला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे भारतात तुर्कस्तान मिशनची सुरक्षा वाढवणे गरजेचे आहे. हल्ल्याच्या इशाऱ्यानंतर भारतीय संस्था, पाश्चिमात्य देशांच्या संस्थांबरोबर मिळून ISIS शी संबंधित इतर देशांत दहशतवाद पसरवणाऱ्या टेरर मॉड्युलला मॉनिटर करत आहे.

यापूर्वी सरकारने याबाबत बोलताना दहशतवादी संघटनांचा काही अल्पसंख्याक समुदाच्या तरुणांना धोका असल्याचे म्हटले होते. मात्र देशावर त्याचा थेट काहीही परिणाम होणार असल्याचे वृत्त मात्र वारंवार फेटाळण्यात आलेले आहे.