आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International Maritime Court Begins Hearing In Hamburg

नौसैनिकांचे मृत्यूप्रकरण : इटलीने जगाची दिशाभूल केल्याचा भारताचा आरोप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हॅम्बर्ग - इटालीयन नौदल सैनिकांकडून करण्यात आलेली दोन मच्छिमारांची हत्या ही भारतीय हद्दीतच झाली आहे. त्याप्रकरणी इटली जगाची दिशाभूल करत आहे, असा आरोप भारताने केला आहे. भारताने हा युक्तिवाद आंतरराष्ट्रीय लवादासमोर केला आहे. इटलीने मच्छिमारांची हत्या भारतीय सागरी हद्दीत झाली नसल्याचा दावा करत कायदेशीर खटला चालवण्याच्या अधिकारालाच आव्हान दिले आहे. हे प्रकरण इटलीने आंतरराष्ट्रीय लवादाकडे घेऊन गेल्यानंतर भारतानेही त्याला सडेतोड प्रत्युत्तर देण्याची तयारी केली आहे. याप्रकरणी येथे मंगळवारी आणि बुधवारी सुनावणी होणार आहे.

भारताने म्हटले की इटलीने याप्रकरणी दिलेले कारण तथ्यहिन व निखालस खोटे आहे. कारण ही घटना भारतीय सागरी हद्दीतच घडली आहे. त्यामुळे हे प्रकरण पूर्णपणे भारतीय न्यायक्षेत्राच्या कक्षेत येणार आहे. भारताने आंतरराष्ट्रीय लवादाकडे याप्रकरणाची पैरवी करण्यासाठी फ्रान्सच्या बड्या कायदे सल्लागारांची मदत घेतली आहे. त्यासाठी कायदेतज्ज्ञ अलांय पॅले व आर. बंडी यांची भारताने सेवा घेतली आहे. हे वकील इंटरनॅशनल ट्रिब्युनल ऑन लॉ इ आॅफ द सीमध्येे (आयटीएलओएस) भारताची बाजू मांडत आहेत. त्यांच्यासोबत अतिरिक्त महाधिवक्ता पी. एल.नरसिंहा यांच्या नेतृत्वाखाली भारतीय परराष्ट्र व गृहमंत्रालयाचे अधिकारी व वकिलांची टीम त्यांना मदत करणार आहे.

भारताने लवादाकडे इटलीची याचिका खारीज करण्याची विनंती केली आहे. ही सुनावणी लवादाचे अध्यक्ष न्यायमूर्ती ब्लादिमीर गोलित्सिन यांच्यासमोर होणार आहे. इटलीने त्यांच्या नौसैनिकांचा बचाव करण्यासाठी हा गोळीबार भारताच्या सागरी हद्दीबाहेर आंतरराष्ट्रीय हद्दीत झाला होता. त्यामुळे भारताला सैनिकांवर खटला चालवण्याचा कोणताही अधिकार नाही, असे म्हटले होते. आमचा सैनिक साल्व्हातोर गिरोने हा निर्दोष असून भारताने त्याला ओलीस ठेवल्याचा आरोपही इटलीने केला आहे.

परंतु भारताने ही हत्या भारतीय सागरी हद्दीतच झालेली असून आम्ही खटला भरू शकतो, असे स्पष्ट करत इटलीचा दावा फेटाळला आहे.

काय आहे प्रकरण?
इटलीचे नौसैनिक मॅसिमिलियानो लातोरे व साल्व्हातोर गिरोने हे "एनारिका लॅक्सी' या जहाजावर तैनात होते. त्यांनी १५ फेब्रुवारी २०१२ रोजी केरळच्या सागरी किनाऱ्यालगत भारतीय नाैकेवर सागरी चाचे समजून गोळीबार केला होता. त्यात दोन मच्छिमारांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर दोन्ही सैनिकांना अटक करण्यात आली होती. त्यांच्यावर आधी केरळच्या उच्च् न्यायालयात व नंतर सर्वोच्च न्यायालयात खटला चालवण्यात आला. त्यावेळी सैनिकांनी आम्ही सागरी चाचे समजून गोळीबार केल्याचा दावा केला होता. यापैकी सैनिक लातोरे अजूनही इटलीत आहे. त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून सर्वोच्च न्यायालयाने त्याची सुटी वाढवली आहे. तर दुसरा सैनिक गिरोने न्यायालयाच्या परवानगीवरून दिल्लीतील इटलीच्या दुतावासात आहे.