आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मित्रासाठी अख्खा वर्ग शिकला सांकेतिक भाषा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
साराजेव्हो (बोस्निया) - जेद सहा वर्षांचा असून युरोपच्या बोस्निया देशात राहतो. तो ऐकू आणि बोलूही शकत नाही. तो पाच वर्षांचा असताना त्याच्या आईने त्याला शाळेत पाठवण्याचा निर्णय घेतला. बोस्नियाने २००३ मध्ये केलेल्या एका कायद्यानुसार शारीरिक अक्षमतेने ग्रस्त असलेल्या कोणत्याही मुलास सर्वसामान्य शाळेत शिकवले जाते.
जेद सर्वसामान्य मुलांप्रमाणे शाळेत जाऊ लागला. दुसऱ्या मुलांशी संवाद साधायचा कसा, ही जेदसमोर सर्वात मोठी अडचण होती. यामुळे त्याला सर्वांपासून वेगळे राहणे भाग पडत होते. दरम्यान, शिक्षिका सनेला जुमनोव्हिक यांनी त्याची अडचण सोडवण्याचे ठरवले. त्यांनी स्वत:च मूकबधिरांची सांकेतिक भाषा शिकण्याचा निर्धार केला. अख्ख्या शाळेत जेदलाच ही भाषा यायची. शिक्षिकेने जेदसोबत संवाद सुरू केला. मात्र, हा प्रयोग काही जमला नाही. यामुळे त्यांना सांकेतिक भाषेचे प्रशिक्षण घ्यावे लागले.
मात्र, एकटा जेदच शिक्षिकेसोबत संवाद साधू शकत होता. यामुळे आता अख्ख्या वर्गालाच ही भाषा शिकवायची, असा चंग शिक्षिकेने बांधला. तीन महिन्यांनंतर ओस्मान नकाल प्रायमरी स्कूलच्या पहिलीच्या वर्गातील मुले याच सांकेतिक भाषेच्या मदतीने आता जेदसोबत संवाद साधू लागली आहेत. ही बिनाशब्दांची भाषा शिकून ती चांगलेच हरखून गेली आहेत. इतकेच नव्हे तर ती घरी जाऊन आपल्या पालकांनाही ही भाषा शिकवू लागली आहेत. शिक्षिकाही बहुतेक वेळा याच भाषेत शिकवू लागल्या आहेत. शाळेतील सामान्य सूचनाही अाता हातवाऱ्यांच्या भाषेनेच दिल्या जातात. इतकेच नव्हे तर शिक्षिकेने जेदला लीप रीडिंगही (ओठांच्या हालचालीवरून शब्दांचा अंदाज बांधणे) शिकवले आहे, जेणेकरून सांकेतिक भाषा न येणाऱ्यांशी त्याला बोलता येईल. शिक्षिका सनेला या आता शाळेच्या अभ्यासक्रमातच ही भाषा आणण्याची तयारी करत आहेत. जेदची आई म्हणाली, आधी तो शाळेत न जाण्यासाठी रडत असे. आता मात्र आनंदाने शाळेत जातो.
फोटो - जेदच्या (मध्यभागी) वर्गातील मुले सांकेतिक भाषेत संवाद साधतात.