आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येमेनमधील युद्ध संपण्याची चिन्हे, इराण रसद थांबवणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तेहरान / टोकियो / इस्लामाबाद - येमेनमधील हौथी बंडखोरांना रसद पुरवणार्‍या इराणला अखेर शहाणपण आले आहे. बंडखोरांचा शस्त्र पुरवठा बंद करण्यास इराणने सहमती दर्शवली आहे. देशातील हिंसाचारात मृतांची संख्या वाढत असतानाच इराणने हा निर्णय घेतला आहे.

येमेनमधील सरकारच्या विरोधात उफाळलेल्या हिंसाचारामागे इराणचा हात असल्याचे मानले जात आहे. हौथी बंडखोरांना इराणची फूस असल्याचे सांगण्यात येते; परंतु दुसरीकडे बंडखोरांना पराभूत करण्यासाठी सौदी अरेबियाच्या नेतृत्वाखालील मित्र राष्ट्रांनी येमेनमध्ये लष्करी हल्ले चढवले. इराणचे राष्ट्राध्यक्ष हसन रोहानी यांनी येमेनमधील गृहयुद्धाच्या समाप्तीसाठी एक राजकीय उपाययोजनेसाठी दाखवलेल्या सहमतीचे समर्थन केले आहे. बुधवारी तेहरानमध्ये तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रिसेप तईप एर्दोगान यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. रोहानी म्हणाले, आम्ही येमेन, इराक, सिरिया आणि पॅलेस्टाइनवर दीर्घ चर्चा केली. या देशांतील युद्धे थांबली पाहिजेत. येमेनमधील हल्ले थांबले पाहिजेत. इतर देशांच्या मदतीने येमेनमध्ये शांतता, स्थैर्य आणि व्यापक सरकार आणि संवाद निर्माण केला जाईल. तुर्कीच्या राष्ट्राध्यक्षांनी गेल्या महिन्यात इराणला बजावले होते. येमेन, इराक आणि सिरियातील आपले सैन्य माघारी बोलावण्यात यावे, असे त्यांनी म्हटले होते.

एक लाख लोक बेघर
येमेनमध्ये बंडखोर आणि मित्रराष्ट्रांच्या फौजा यांच्यातील संघर्ष रस्त्यावर पाहायला मिळू लागला आहे. त्यात गेल्या आठवड्यात ५६० हून अधिक जणांचा मृत्यू तर १७०० पेक्षा जास्त नागरिक जखमी झाले होते. सुमारे १ लाखाहून अधिक नागरिकांना घरेदारे सोडून सुरक्षित स्थळी जावे लागले आहे. भारताने ४ हजारांहून अधिक नागरिकांना सुरक्षित काढले आहे. त्याशिवाय भारताने २६ देशांतील २३२ नागरिकांना सुखरूप काढले आहे.

अल-कायदाला पाय पसरण्याची संधी : अमेरिका
अमेरिकेचे संरक्षण मंत्री अ‍ॅश्टन कार्टर म्हणाले, येमेनमध्ये हिंसाचार भडकल्याने अल-कायदाला पुन्हा पाय पसरण्याची संधी मिळाली आहे. येमेनमधील अस्थिरतेचा फायदा हौथी आणि अरेबियातील अल-कायदासारख्या दहशतवादी संघटना घेऊ लागल्या आहेत. त्यांच्या निशाण्यावर अमेरिकादेखील आहे.

पाकिस्तानच्या संसदेत तिसर्‍या दिवशीही चर्चा
पाकिस्तानच्या संसदेत येमेन मुद्द्यावर बुधवारी तिसर्‍या दिवशीही चर्चा झाली. पंतप्रधान नवाझ शरीफ म्हणाले, आपल्याला या मुद्द्यावर घाई करून चालणार नाही. दुसरीकडे इराणचे परराष्ट्र मंत्री जवद जरीफ बुधवारी इस्लामाबादमध्ये दाखल झाले. सौदी अरेबियाने हौथी बंडखोरांना पळवून लावण्यासाठी पाकिस्तानच्या लष्कराची मदत मागितली आहे.

वैद्यकीय सुविधांच्या अभावाने परिस्थिती बिकट
येमेनमध्ये पुरेशा वैद्यकीय सुविधांचाही अभाव असल्याने मानवी हक्काची सर्रास पायमल्ली होत आहे. हवाई हल्ल्यांत १ हजार ७०० नागरिक जखमी झाल्याचे वृत्त आहे. युद्धस्थ प्रदेशात वैद्यकीय सुविधा पोहोचवण्यासाठी रेड क्रॉसने जय्यत तयारी केल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले.