आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धर्मगुरूंच्या फाशीचे प्रकरण: इराण-सौदी संघर्ष वाढला; सौदीने सर्व संबंध तोडले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तेहरान- शिया धर्मगुरूंना देण्यात आलेल्या मृत्युदंडावरून सौदी अरेबिया आणि इराण यांच्यातील संबंध ताणले आहेत. दूतावासाच्या जाळपोळीचे कारण सांगून रविवारी रात्री उशिरा सौदी अरेबियाने इराणसोबतचे सर्व संबंध तोडल्याचे जाहीर केले. त्यापाठोपाठ सुदान, बहरिनने देखील इराणसोबतचे संबंध संपुष्टात आल्याचे जाहीर केले. त्यामुळे आता पश्चिम आशियातील तणाव वाढू लागला आहे.

सौदीचे परराष्ट्रमंत्री अब्देल अल जुबैर यांनी इराणमधील आपल्या राजदूतांना ४८ तासांत मायदेशी येण्याची सूचना केली आहे. इराणसोबतचे द्विपक्षीय, सामरिक संबंध संपल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तेहरानमधील सौदी अरेबियाच्या राजदूत कार्यालयाला संतप्त शिया समर्थकांनी आग लावली होती. त्यावरून दोन्ही देशांत अगोदर शाब्दिक युद्ध वाढले होते. त्याचे पर्यवसान संबंध तोडण्यात झाले. दुसरीकडे सौदीची शिया समुदायाच्या विरोधातील आक्रमकता यापूर्वीदेखील पाहायला मिळाली होती. सौदीने येमेनमधील बंडखोर शिया गटाच्या विरोधात लष्करी कारवाई केली होती. त्या वेळीदेखील ही आक्रमकता दिसली होती.

दरम्यान, सौदीमध्ये सुन्नी समुदायाची सत्ता आहे. देशातील शिया अल्पसंख्याकांत सुन्नी सत्ताधाऱ्यांकडून अन्याय होत असल्याची भावना आहे. प्रगत देशांबरोबर अणुकरार होऊ नये यासाठी सौदीने बरेच प्रयत्न केले होते.
दोन्ही राष्ट्रांचे एकमेकांवर शरसंधान
सौदी अरेबिया आणि इराण यांनी परस्परांवर दहशतवादाला खतपाणी घालण्याचे आरोप केले आहेत. अरब क्रांतीसाठी चिथावणी देणारे शिया धर्मगुरू निम्र यांना फाशी देण्यात आली. त्यात गैर काही नाही, असे सौदीला वाटते. त्याचबरोबर इराणने अशी प्रतिक्रिया देऊन एक प्रकारे दहशतवाद्यांना पाठिंबा दिला आहे. येमेनमधील हौथींना पाठिंबा देऊन त्यांनी त्याचा पुरावा दिला आहे. सिरियातील बंडखोरांना पाठिंबा देऊन सौदीने एक प्रकारे दहशतवाद्यांचे समर्थन केले आहे, असा आरोप इराणने केला आहे. सिरियातील शियावंशीय बशर अल असाद यांची हकालपट्टी करण्यासाठी हा खटाटोप चालला आहे.

१९८८-१९९१ मध्येही होता तणाव : सौदी अरेबिया आणि इराण यांच्यात पहिल्यांदाच अशा प्रकारचा तणाव निर्माण झालेला नाही. यापूर्वी ८० च्या दशकातदेखील तणाव झाला होता. १९८८ ते १९९१ दरम्यान उभय देशांचे संबंध ताणले गेले होते.

इराणला हिंसाचाराचा मोठा इतिहास : जुबैर
इराणला राजदूत कार्यालयांची तोडफोड करण्याचा मोठा इतिहास आहे. त्यामुळे आपल्या सवयीप्रमाणे ते वागले आहेत. १९७९ मध्ये अमेरिकेच्या राजदूत कार्यालयाची नासधूस करण्यात आली होती, असे सौदीचे परराष्ट्रमंत्री अब्देल अल-जुबैर यांनी म्हटले.

शिया गुरूंच्या फाशीनंतर आली उभय देशांत कटुता
सौदीने अल-निम्र यांच्यासोबत आणखी

काही शिया नेत्यांना मृत्युदंड दिला होता. त्यात काहींना गोळ्या घालून ठार करण्यात आले, तर काहींचा शिरच्छेदही झाला होता. त्यानंतर सौदीच्या विरोधात बहरिन ते पाकिस्तानपर्यंत निदर्शने झाली होती.
बातम्या आणखी आहेत...