आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाकिस्तानच्या गुप्तहेर संस्थेचे दहशतवाद्यांशी लागेबांधे; अमेरिकी सैन्याधिकाऱ्याचा दावा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - अमेरिकेच्या जॉइंट चीफ्स ऑफ स्टाफचे अध्यक्ष जनरल जोसेफ डनफोर्ड यांनी म्हटले की, पाकिस्तानची गुप्तहेर संस्था आयएसआयचे स्वतंत्र परराष्ट्र धोरण आहे. त्यांचे लागेबांधे दहशतवादी गटांशी आहेत. अमेरिकी संसदेच्या सिनेटमधील परराष्ट्र संबंध समितीसमोर सुनावणीमध्ये जन. डनफोर्ड यांनी म्हटले की, आयएसआयचे संबंध दहशतवादी संघटनांशी आहेत. 

डनफोर्ड यांना सिनेटर जोए डोन्नेली यांनी विचारले होते की,  आयएसआय तालिबानची मदत करते का? अमेरिकी अधिकाऱ्यांनी पाकिस्तानविषयी संशय व्यक्त केला आहे. नुकतेच डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला दहशतवाद्यांना आश्रय देणारा देश म्हटले होते. भारत आणि अफगाणिस्तान पूर्वीपासूनच पाकिस्तानवर दहशतवाद्यांचा आश्रयदाता देश म्हणून आरोप करत आले आहेत.  
 
पाकिस्तानच्या धोरणात बदल करण्यासाठी अमेरिकेचा दबाव
पाकिस्तानने धोरणे बदलावीत यासाठी अमेरिका द्विपक्षीय चर्चेचा मार्ग अवलंबत असल्याचे डनफोर्ड यांनी सांगितले. पाकिस्तानचे धोरण नजीकच्या काळात बदलण्याची शक्यता नसल्याचेही ते म्हणाले. बहुपक्षीय चर्चेने यावर तोडगा निघू शकतो.  
 
पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री अमेरिकेच्या दौऱ्यावर  
 
पाकिस्तानच्या आयएसआयवर अमेरिकेने केलेल्या आरोपानंतर आता पाकचे परराष्ट्रमंत्री ख्वाजा आसिफ बुधवारी ३ दिवसांच्या अमेरिका दौऱ्यासाठी वॉशिंग्टनमध्ये दाखल झाले आहेत. आसिफ अमेरिकी परराष्ट्रमंत्री रेक्स टिलर्सन, राष्ट्रिय सुरक्षा सल्लागार एच. आर. मॅकमास्टर यांची भेट घेतील. अमेरिकी इन्स्टिट्यूट ऑफ पीसमध्ये मुत्सद्द्यांच्या चमुसमोर ते आपली भूमिका मांडतील. गेल्या आठवड्यात संयुक्त राष्ट्र महासभेत पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी पाकिस्तानच्या दहशतवादासाठी अमेरिकेवर आरोप केले होते. दहशतवादी समूह आणि हक्कानी नेटवर्क, हाफीज सईदवर कारवाईसाठी पाकिस्तानवर दबाव आणला जात आहे. २० ते ३० वर्षांपूर्वी हेच सर्व अमेरिकेला परमप्रिय होते, असे आसिफ म्हणाले.  हक्कानी नेटवर्क आणि तत्सम सक्रिय गटांना अमेरिका दशकभरापूर्वी ‘डार्लिंग’ संबोधत असल्याचा आरोप  पाकच्या परराष्ट्र मंत्र्यांनी केला. 
 
पाकने भारताशी आर्थिक संबंध दृढ करावेत : मॅटिस  
अमेरिकी संरक्षणमंत्री जेम्स मॅटिस यांनी म्हटले आहे की, पाकिस्तानने दहशतवादाला थारा न देता भारताशी आर्थिक स्तरावर संबंध दृढ करावेत. सिनेटच्या आर्म्ड सर्व्हिसेस कमिटीसमोर मॅटिस म्हणाले की, भारत-पाक शेजारी राष्ट्रे आहेत. त्यांनी आर्थिक संबंधांवर भर द्यावा. पाकविषयी ट्रम्प यांची भूमिका दृढ आणि स्पष्ट आहे. पाकच्या धोरणात बदल करण्यासाठी ट्रम्प प्रयत्नशील आहेत. अफगाणिस्तानमधील दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी पाकची मदत घेण्याचा एकदा प्रयत्न करण्यात येईल. त्यात यश आले नाही तर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प योग्य तो निर्णय घेतील.
 
बातम्या आणखी आहेत...