आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अबू अल बगदादी ठार! अमेरिकेने ठेवले होते एक कोटी डॉलरचे बक्षीस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तेहराण - इस्लामी स्टेट ऑफ इराक अँड सिरिया अर्थात ‘इसिस’ या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या अबू बकर अल बगदादी ठार झाला आहे, असा दावा ‘रेडिओ इराण’ने सोमवारी केला. त्याने इराक आणि सीरियात मोठ्या प्रमाणावर हत्याकांड घडवून मोठ्या भूभागावर कब्जा केला होता. तसेच तेथे खलिफाचे राज्य स्थापन करून स्वत:ला खलिफा घोषित केले होते. अमेरिकेने त्याच्यावर एक कोटी डॉलरचे बक्षीस ठेवले होते.

अमेरिकेने चालवलेल्या जोरदार ड्रोन हल्ल्यात १८ मार्चला बगदादी गंभीर जखमी झाला होता, असे वृत्त काही दिवसांपूर्वी आले होते. इसिसच्या दहशतवाद्यांनी हे वृत्त चुकीचे असल्याचे म्हटले होते. ‘रेडिओ इराण’नुसार, सीरियाच्या सीमेजवळील निनेवे प्रांतात १८ मार्चला झालेल्या ड्रोन हल्ल्यात बगदादी गंभीर जखमी झाला होता. त्याला सीरियाच्या गोलान पर्वतातील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या वृत्तानुसार, आता इसिसने बगदादीच्या ताकदीच्या उत्तराधिकाऱ्याचा शोध सुरू केला आहे.

अमेरिकेने केले होते खंडन
अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाने सिरियाच्या सीमेवर ड्रोन हल्ल्यात बगदादी जखमी झाल्याच्या वृत्ताचे खंडन केले होते. या वृत्ताला पुष्टी देणारा कुठलाही पुरावा नाही, असे पेंटागॉनच्या प्रवक्त्याने सांगितले होते.

समोर आला नव्हता
स्वत:ला खलिफा जाहीर केल्यानंतर बगदादी सार्वजनिकरीत्या कधीच समोर आला नव्हता. जुलैत त्याचा एक व्हिडिओ जारी झाला होता. त्यात तो एका मशिदीत मुस्लिमांना स्वत:साठी पाठिंबा मागत होता. तेव्हाच बगदादी दिसतो कसा, हे कळले. त्यानंतर तो जिवंत आहे की मृत, याबद्दल कयास लावले जात होते.

बगदादी अनबारमध्ये?
खलिफा (बगदादी) जखमी झाल्याच्या बातम्या चुकीच्या आहेत. तो अनबारमध्ये असून, सफाविदांविरोधात युद्धाचे नेतृत्व करत आहे, असा दावा आयएसचा प्रवक्ता अबू असद अन्सारीने २४ एप्रिलला केला होता. आयएसला जगातील सर्वात क्रूर संघटना म्हणून ओळख मिळवून देणाऱ्या बगदादीच्या व्यक्तिमत्त्वाच्या प्रभावामुळे अनेक तरुण आयएसमध्ये दाखल झाले होते.

बगदादीनंतर कोण?
बगदादी याचा खरेच मृत्यू झाला असेल तर आता त्याच्या जागी कोण, हा प्रश्न निर्माण होत आहे. संघटनेतील एखाद्या दहशतवाद्याची या जागेसाठी निवड झाली तरी त्याला खलिफा जाहीर केले जाणार की नाही, हा पण प्रश्न आहे. नव्या नेत्यामध्ये केवळ संघटनकौशल्य असून चालणार नाही तर त्याला धर्माचेही उत्तम ज्ञान असायला हवे, असा आयएसचा दंडक आहे. परदेशातील दहशतवाद्यांशी सुसंवाद हा गुण पण त्याच्यात असायला हवा. असा नेता आयएसला आगामी काळात मिळेल का, याबद्दल जगभरात उत्सुकता आहे. यापूर्वी उमर अल सिंसासी याला बगदादी याचा उत्तराधिकारी निवडण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. मात्र, नंतर हा निर्णय मागे पडला. उमर याला धर्मातील तत्त्वांबद्दल विशेष ज्ञान नव्हते. तो उत्तम संघटक होता. अत्यंत क्रूर संघटना चालवताना या संघटनेतील सदस्यांच्या समस्येची पूर्ण जाण ठेवणे, हे बगदादी याचे कौशल्य होते. त्यामुळेच तो जगभरातील दहशतवाद्यांना आकर्षित करू शकत होता.
बातम्या आणखी आहेत...