आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोख प्रत्युत्तर: शिरच्छेदामु‌ळे संतप्त इजिप्तचे आयएसच्या तळांवर बॉम्बहल्ले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कैरो- इस्लामिक स्टेट (आयएस) या दहशतवादी संघटनेने इजिप्तच्या २१ ख्रिश्चन नागरिकांचा शिरच्छेद केल्याचा व्हिडिओ रविवारी रात्री जारी केल्याने खळबळ उडाली आहे. त्यानंतर काही तासांतच संतप्त इजिप्तने आयएसच्या लिबियातील तळांवर मोठ्या प्रमाणात हवाई हल्ले केले.
सोमवारी सकाळपासूनच इजिप्तच्या लष्कराने हवाई हल्ल्यास सुरुवात केली. लिबियामध्ये बंडखोरांना दडपण्यासाठी इजिप्तने नेहमीच लिबियाच्या हुकूमशाही सरकारला आपला पाठिंबा दिला आहे. इस्लामिक कट्टरवाद्यांशी लढा देण्यासाठी इजिप्त लिबियाला सहकार्य करत आले आहे. हल्ल्याच्या अगोदर रविवारी रात्री राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह-अल-सिसी यांनी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात आयएसला चोख उत्तर दिले जाईल, असे स्पष्ट केले होते. ख्रिश्चन नागरिकांना ठार करणाऱ्यांना कसे व कोठे उत्तर द्यायचे याचे अधिकार आमच्याकडे आहेत. दहशतवाद्यांनी सर्व मानवी मूल्यांना धक्का दिला आहे, अशा शब्दांत सिसी यांनी आपला संताप व्यक्त केला. त्याचबरोबर मृत नागरिकांच्या नातेवाइकांच्या दु:खात सहभागी आहे.
भूमध्य सागराच्या बेटावर २१ जणांची हत्या
आयएसचे हाती चाकू घेतलेले काळ्या कपड्यातील दहशतवादी निष्पाप नागरिकांचा एका रांगेत शिरच्छेद करताना व्हिडिआेमध्ये दाखवण्यात आले आहे. दहशतवाद्यांनी काळे मुखवटे धारण केलेले दिसून येते. ‘अ मेसेज साइंड विथ ब्लड टू द नेशन ऑफ क्रॉस’ असे व्हिडिआेचे शीर्षक आहे. केशरी रंगाचे जम्पसूट परिधान केलेले अनेक ख्रिश्चन नागरिक गुडघे टेकून बसलेले त्यात दिसून येतात. लिबियाच्या पश्चिमेकडील भूमध्य सागराच्या बेटावर शिरच्छेद करण्यात आल्याचे व्हिडिआेमध्ये दिसून येते. व्हिडिआेच्या शेवटी एक आेळ दाखवण्यात आली आहे ती अशी - ‘तुम्ही लादेनचा मृतदेह समुद्रात लपवून ठेवला. तो समुद्र तुमच्या रक्ताने लाल करू.’

नोकरीसाठी लिबियात
लिबिया हा तेल उत्पादक असा श्रीमंत देश आहे. तेथे नोकरी मिळावी म्हणून इजिप्तमधील बेरोजगारांचे तांडे रोज सीमा आेलांडून जातात. गेल्या महिन्यातही २१ ख्रिश्चन नागरिक नोकरीसाठी गेले होते; परंतु ते बेपत्ता झाल्याचे गेल्या आठवड्यात स्पष्ट झाले होते. परंतु त्यांचे आयएसने अपहरण केले होते. त्यानंतर रविवारी रात्री आयएसने त्यांच्या हत्येचा व्हिडिओ जारी केला.