बेरूत - ISIS ने इराकच्या मोसूलमध्ये निवडणूक आयोगाच्या 300 पेक्षा अधिक सरकारी कर्मचाऱ्यांची हत्या केली आहे. ISIS ची विचारधारा मान्य न करणे आणि धर्माचा अपमान केल्याच्या आरोपामध्ये या सर्व कर्मचाऱ्यांना एका रांगेत उभे करून गोळ्या घालण्यात आल्या.
मृतांमध्ये 50 महिला
इराकच्या एका सुरक्षा अधिकाऱ्याने स्पेनची वृत्तसंस्था EFE ला दिलेल्या माहितीनुसार ISIS च्या ताब्यात असलेल्या मोसूलमध्ये हा नरसंहार करण्यात आला आहे. शनिवारी या निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांची हत्या करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. निनेवेह प्रांतातील नॅशनल मल्टीट्यूड मिलिशियाचे प्रवक्ते मेहमूद अल-सौर्यी यांनी मृतांमध्ये ५० महिला असल्याचेही सांगितले. त्याचवेळी इराकच्या सुप्रीम इलेक्शन कमिशनच्या मुख्यालयाने जारी केलेल्या स्टेटमेंटमध्ये मोसूलमध्ये एका संघटनेने त्यांच्या कर्मचाऱ्यांनी चाकूने भोसकून हत्या केल्याचे म्हटले आहे. कमिशनने इंटरनॅशनल कम्युनिटीला इराकींच्या विरोधात होणाऱ्या हिंसेप्रकरणी लवकरात लवकर हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.
इराकच्या उपराष्ट्रपतींनी व्यक्त केले दुःख
इराकच्या उपराष्ट्रपतींच्या कार्यालयाकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनामध्ये या घटनेबाबत दुःख व्यक्त करण्यात आले आहे. मोसूलचे नागरिकांचे या संघटनेविरोधात लढताना मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्याचे आम्हाला दुःख आहे, असे यामध्ये म्हणण्यात आले आहे.