लंडन - पॅरिस हल्ल्यासारखे हल्ले लंडन, बर्लिन आणि रोममध्ये केले जातील, अशी धमकी इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेच्या एका समर्थक गटाने दिली आहे. एका व्हिडिआेद्वारे ही धमकी देण्यात आली आहे. त्यात ब्रिटनची संसद आणि आयफेल टॉवर कोसळलेले दाखवण्यात आले आहे.
पॅरिसमध्ये काल घडू शकते...उद्या लंडन किंवा बर्लिन किंवा रोमही असू शकते. ते टाळायचे असल्यास तुमच्यासमोर काही पर्याय आहेत. ते निवडा. एक तर इस्लाम स्वीकार करा किंवा काही तरी योगदान द्या किंवा लष्करी कारवाई तरी थांबवा, असा संदेश व्हिडिआेतून देण्यात आला आहे. रोममधील काही ऐतिहासिक वास्तू, सिरिया, इराकमधील शिर कत्तल केल्याच्या काही घटनाही व्हिडिआेमधून दाखवण्यात आल्या आहेत. अरबीतून ही धमकी देण्यात आली आहे. परंतु त्याचे इंग्लिश रूपांतर करून इशारा देण्याचा प्रयत्न झाला आहे. पॅरिसमध्ये इसिसच्या दहशतवाद्यांनी काफिर किंवा इस्लामेतर लोकांना मारण्यासाठी आत्मघातकी हल्ला आणि गोळीबार करण्यात आला, असे त्यामधून सांगण्यात आले.
पॅरिसमधील हल्ला शत्रू असलेल्या देशांसाठी केवळ इशारा आहे. ब्रिटिश पंतप्रधान डेव्हिड कॅमरून यांनी पश्चिमेकडे इसिसने दहशतवादी कारवाया केल्यास त्यांचा नायनाट केला जाईल, असे म्हटले होते. त्याच्या एक आठवड्यानंतर धमकीचा हा व्हिडिआे जारी झाला आहे. गेल्या वर्षी पॅरिसमध्ये झालेल्या स्फोट मालिकेत किमान १३० जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर ब्रुसेल्समध्ये यावर्षी आत्मघातकी हल्ला झाला होता. त्यात ३२ जण ठार झाले होते. परंतु पाश्चात्त्य देशांनी इसिसच्या विरोधात मोठी लष्करी मोहीम सुरू केल्याने दहशतवादी संघटनेला सिरियातील मुळे गमावावी लागली होती. त्यामुळे इसिसची मुळे कापली जात आहेत.