आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • ISIS Paris Attacks : French President Took Charge In Stadium

हल्लेखोराकडे मॅचचे तिकीट, राष्ट्राध्यक्षांनी स्टेडियममधून सांभाळली परिस्थिती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्टेडियमबाहेर झालेल्या स्फोटानंतर जागेवर उभे राहिलेले फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष ओलांद - Divya Marathi
स्टेडियमबाहेर झालेल्या स्फोटानंतर जागेवर उभे राहिलेले फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष ओलांद
पॅरिस - फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये शुक्रवारी रात्री झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर अनेक खुलासे समोर येऊ लागले आहेत. पॅरिस पोलिसांच्या माहितीनूसार, एका दहशतवाद्याकडे नॅशनल स्टेडियममध्ये सुरु असलेल्या फुटबॉल सामन्याचे तिकीट होते. त्याला आत जाण्यापासून रोखल्यानंतर त्याने बाहेर स्फोट घडवून आणला. फ्रान्स-जर्मनी दरम्यानचा फुटबॉल सामना पाहाण्यासाठी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष ओलांद यांच्यासह 80 हजार प्रेक्षक होते. हल्ल्याची माहिती मिळाल्यानंतर ओलांद यांनी स्टेडियमच्या कंट्रोलरुममधून देशातील आंतर्गत सुरक्षेवर नजर ठेवली. ओलांद यांचे त्यावेळचे छायाचित्र रविवारी समोर आले.
काय झाले पॅरिसमध्ये
पॅरिसच्या नॅशनल स्टेडियमसह सहा ठिकाणी शुक्रवारी रात्री बॉम्बस्फोट आणि गोळीबार करत दहशतवादी हल्ला झाला. यात 127 निष्पाप लोक ठार झाले. या हल्ल्याची तुलना मुंबईत 2008 मध्ये झालेल्या 26/11 हल्ल्याशी केली जात आहे. दहशतवाद्यांनी दोन रेस्तराँ, एक म्युझिक कॉन्सर्ट हॉल आणि फुटबॉल मैदानाला लक्ष्य केले होते. दहशतवादी आयएसआयएस या कुख्यात दहशतवादी संघटनेच्या स्लिपर सेलचे असल्याचे मानले जात आहे. प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत 8 दहशतवाद्यांना ठार करण्यात आले. त्यातील एकाकडे सिरियाचा पासपोर्ट सापडला आहे. (सविस्तर वृत्त वाचण्यासाठी, पॅरिसमध्ये सर्वात मोठा अतिरेकी हल्ला, येथे क्लिक करा, )
स्टेडियमपर्यंत कसा पोहोचला दहशतवादी
फ्रेंच मीडियातील वृत्तानूसार, स्टेडियमबाहेर एक दहशतवादी प्राथमिक तपासणीतून पुढे सरकत मुख्य प्रवेशद्वाराजवळ पोहोचला होता. येथील सुरक्षा रक्षकांना मात्र त्याच्या हलचालींवर आणि हावभावावर शंका आली. जेव्हा त्याची तपासणी करण्यात आली, त्याच्याकडे सुसाइड जॅकेट सापडले. त्याला आत जाण्यापासून रोखण्यात आल्यानंतर त्याने स्वतःला उडवून दिले. स्टेडियमबाहेर झालेल्या स्फोटात 28 लोक गतप्राण झाले. तेव्हा स्टेडियममध्ये फुटबॉल सामना सुरु होऊन 15 मिनिटे झाली होती.

हल्ल्याची माहिती ओलांद यांना कशी कळाली
ज्यावेळी स्टेडियमबाहेर स्फोट झाले, त्यानंतर ओलांद यांच्या एका बॉडीगार्डने त्यांच्या जवळ जात, त्यांच्या कानात हळु आवाजात पॅरिसमध्ये स्फोट झाल्याचे सांगितले. त्यानंतर ओलांद उठून उभे राहिले तेव्हा स्टेडियमबाहेर झालेल्या स्फोटाच्या आवाजाने प्रेक्षकही उभे राहिले आणि मैदानाकडे निघाले. ओलांद यांना तातडीने स्टेडियमच्या कंट्रोलरुममध्ये नेण्यात आले. त्यांनी तेथूनच परिस्थितीचा आढावा घेण्यास सुरुवात केली. देशातील अंतर्गत सुरक्षेची माहिती घेतली. तोपर्यंत स्टेडियमबाहेर आणखी एक स्फोट झाला. स्टेडियममधील लोकांना हळुहळु बाहेर काढण्यात आले. जवळपास पाच मिनीटांनंतर ओलांद यांना स्टेडियमबाहेर नेण्यात आले. तेथून जवळच असलेल्या गृहमंत्रालयाच्या कार्यालयात ते पोहोचले आणि येथेच आपातकालिन बैठक बोलावली.
रविवारच्या अपडेट्स
>> पॅरिस हल्ल्यात सहभागी दहशतवाद्यांचे संबंध सिरीयन रिफ्यूजीपर्यंत.
>> मारण्यात आलेल्या आठ दहशतवाद्यांपैकी एकाची ओळख पटली. त्याचे नाव उमर इस्माइल मुस्तफा (29) असल्याचे समजते. सुसाइड हल्ला करणाऱ्यांपैकी तो एक होता. हा फ्रान्सचाच नागरिक आहे.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, राष्ट्राध्यक्ष ओलांद यांचे हल्ल्याची माहिती मिळाल्यानंतरचे स्टेडियमधील फोटोज्