आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • ISIS Urging Lone Wolf Attacks On U.S. Military Personnel. News In Marathi

आयएस लढा: अमेरिकेला दैनंदिन 29 कोटींचा खर्च, कुर्द सैनिकांच्या मदतीने हल्ले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन- अमेरिकेने इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेविरोधातील आपल्या कारवायांमध्ये वाढ केली आहे. यासाठी अमेरिकेने जुलै महिन्याच्या शेवटच्या १५ दिवसांमध्ये बॉम्ब तसेच अन्य सामग्रींवर दररोज ४६ लाख डॉलर अर्थात २९ कोटी ९३ लाख रुपये सरासरी खर्च केले आहेत. ही आकडेवारी आधीपेक्षा तब्बल दुप्पट आहे.

सिरियात आयएसच्या ताब्यातील भागांत कुर्द सैनिकांच्या मदतीने तसेच उत्तर पश्चिम शहरांमध्ये इराकच्या सैनिकांच्या मदतीने अभियान गतिशील केले आहे. सेंटर फॉर स्ट्रॅटेजिक अँड इंटरनॅशनल स्टडीजच्या एका संरक्षण विश्लेषकाच्या मते, दोन्ही देशांतील सैनिकांच्या संयुक्त अभियानामुळे बॉम्बवर्षाव मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडचे प्रवक्ते लेफ्टनंट कमांडर कायले रेन्स यांच्या मते, जुलै महिन्यात बॉम्ब आणि अन्य स्फोटकांचा वापर मागील महिन्याच्या तुलनेत ६७ पटींनी वाढला आहे.

पेंटागॉनकडून जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, अमेरिकेने ८ ऑगस्ट २०१४ ते ३१ जुलै २०१५ या काळादरम्यान आयएसविरोधातील युद्धावर सुमारे ३.५ अब्ज डॉलर खर्च केले आहेत. जुलैच्या शेवटच्या दोन आठवड्यांत युद्धसामग्रीवर दैनंदिन ४६ लाख दशलक्ष डॉलरपेक्षा अधिक खर्च झाला. मागच्या महिन्यात हा खर्च २० लाख ३३ हजार डॉलर होता.

दहशतवाद्यांना वॉशिंग मशीन, फ्रिज भेट : युवकांना दहशतवादी संघटनेत भरती करण्यासाठी इस्लामिक स्टेटने अनोखी शक्कल लढवली आहे. संघटनेत सामिल होणाऱ्यांना वॉशिंग मशीन, फ्रिज, कुकर, कारपेटसारख्या वस्तू दिल्या जात आहेत, असा खुलासा आयएसचे प्रचारक तसेच माजी सैनिक उमर हुसैनने केला आहे. तो लोकांना संघटनेत सामिल करून घेण्यासाठी प्रयत्न करतोय. शिवाय, अन्य देशांमधून आपल्या मुलांनाही घेऊन येणाऱ्यांना रोख रकमेचे पुरस्कारही दिल्या जात असल्याचा दावा ब्रिटनच्या एका वर्तमानपत्राने केला आहे.

आयएसकडून रासायनिक शस्त्रांचा वापर : अमेरिका
इस्लामिक स्टेट अर्थात आयएस या संघटनेने इराकमध्ये कुर्द विद्रोहींच्या विरोधात या आठवड्यात रासायनिक शस्त्रांचा वापर केला. एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मते, आमच्याकडे याबाबतचे खात्रीलायक वृत्त आहे की दहशतवाद्यांनी हल्ल्यादरम्यान रासायनिक शस्त्रांचा वापर केला. दहशतवाद्यांनी इराक आणि सिरियातील हल्ल्यासाठी रासायनिक शस्त्रांचा साठा जमवल्याचेही वृत्त आहे.