आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जपानच्या सम्राटांनी मागितली व्हिएतनामच्या महिलांची माफी, जपानी सैनिकांनी विवाह करुन सोडून दिले होते

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हनोई - जपानचे सम्राट आकिहितो व सम्राज्ञी मिचिको व्हिएतनामच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी गुरुवारी ७२ वर्षांपूर्वीची कटुता दूर करण्याचा प्रयत्न केला. उभयतांनी व्हिएतनामच्या कुटुंबांबद्दल सहानुभूती दर्शवली. दुसऱ्या महायुद्धादरम्यान विवाह करून व्हिएतनामी महिलांना सोडून जपानी सैनिक निघून गेले होते. सम्राटांनी एका अशा ९२ वर्षीय महिलेची भेट घेतली. तिला १५ मुले आहेत. या ह्रद्य भेटीतून सर्वांच्याच वेदनेला जणू वाट मिळाली होती.
 
जपानचे सम्राट व सम्राज्ञी पहिल्यांदाच व्हिएतनामच्या दाैऱ्यावर दाखल झाले आहेत. युद्धानंतर जपानच्या सैनिकांच्या कुटुंबासोबत येथे राहिलेल्या लोकांचे काय हाल झाले आहेत, हे आम्ही समजू शकतो. कुटुंबांना व्हिएतनाममध्येच सोडून सैनिक निघून गेल्यानंतर कुटुंबावर कोसळलेल्या दु:खाची देखील आम्हाला पूर्ण कल्पना आहे, असे उभयतांनी याप्रसंगी सांगितले. गेल्या ७२ वर्षांपासून दोन्ही देशांत यावरुन कटुता होती. या दौऱ्यामुळे ही कटुता काही प्रमाणात का होईना कमी झाली आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जपानचे व्हिएतनामवर वर्चस्व होते.

केवळ थी शुआन यांनी घेतली राजांची भेट
पहिल्या तुकडीतील एका सैनिकाची पत्नी गुएन थी शुआन यांनी गुरुवारी जपानच्या राजांची भेट घेतली. त्यांचे वय आता ९२ वर्षे आहे. हयात असलेल्या सैनिकांच्या पत्नींपैकी धडधाकट असलेल्या शुआन एकमेव राहिल्या आहेत.

नऊ वर्षे सोबत राहिल्या, चार मुलांचा सांभाळ केला : राजा-राणीच्या भेटीने शुआन यांचा भावनांचा बांध फुटला. त्या म्हणाल्या, तुम्ही भेटीसाठी वेळ काढला याचा अत्यानंद झाला आहे. पती व्हियतमिन्ह लष्कराला फ्रान्सच्या विरोधात लढण्यासाठी प्रशिक्षण देत होते. पती १९५४ मध्ये देश सोडण्यापूर्वी नऊ वर्षे सोबत राहिले होते. मुलांचा सांभाळ करण्यासाठी खूप परिश्रम केले. 

शेजाऱ्यांकडून वाईट वागणूक : राजा-राणीची भेट घेतलेल्यांमध्ये काआे कान्ह थुआँग या १५ वर्षांच्या मुलाचाही समावेश  होता. त्याचे वडील १९५४ मध्ये आई, चार भावंडांना सोडून निघून गेले होते. त्यानेही आपली व्यथा या वेळी मांडली. शेजारी आपल्या मुलांसोबत आम्ही खेळू देत नव्हते. ते आम्हाला जपानी फॅसिस्टांचे मुले असे म्हणत, असा अनुभव त्याने सांगितला.

८०० सैनिकांनी दिले होते स्वातंत्र्यात योगदान
दुसऱ्या महायुद्धाचा समारोप झाल्यानंतर १९४५ मध्ये जपानने शरणागती पत्करली होती. तेव्हा सुमारे ६०० ते ८०० सैनिक व्हिएतनाममध्येच राहिले होते. त्यांनी हो ची मिन्ह यांच्या लढवय्यांना फ्रान्सपासून देशाला स्वतंत्र करण्यासाठी मदत केली होती.
 
कम्युनिस्टांनी ७१ सैनिकांना पळवले होते
फ्रान्सला पराभूत केल्यानंतर व्हिएतनामवर कम्युनिस्ट सत्ता होती. तेव्हा सत्ताधाऱ्यांनी १९५४ मध्ये ७१ जपानी सैनिकांच्या पहिल्या तुकडीला देश सोडायला भाग पाडले होते. त्यामुळे जपानी सैनिकांना आपले कुटुंब येथे सोडून निघून जावे लागले होते. १९६० मध्ये जपानी सैनिकांच्या अंतिम तुकडीला व्हिएतनाम सोडावे लागले होते. परंतु त्या वेळी ते कुटुंबासमवेत मायदेशी परतले होते.
 
बातम्या आणखी आहेत...