आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आता रोबोटिक हातही करतील जीन्स, टी-शर्टची शिलाई

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिएटल - अमेरिकेतील स्टार्टअप स्यूबोने रेडिमेड गारमेंट्स बनवणाऱ्या तंत्रज्ञानाचा विकास केला असल्याचा दावा केला आहे. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून रोबोटिक हात स्वत:च कपडे शिवत असल्याचा दावा या स्टार्टअपने केला आहे. यामध्ये कोणत्याच महिला किंवा पुरुषाला स्वत: कपडे शिवण्याची अावश्यकता नाही.
अमेरिकी सरकारच्या वतीने चार वर्षांपूर्वी या स्टार्टअपला ७.९८ कोटी रुपयांची मदत करण्यात आली होती. त्या वेळी असे कोणतेच तंत्रज्ञान उपलब्ध नव्हते. सरकारची मदत मिळाल्यानंतर स्यूबोने जीन्स, टी शर्ट, शर्ट तयार करण्यासाठी रोबोटिक तंत्रज्ञानामध्ये अनेक सुधारणा केल्या. हे तंत्रज्ञान आमच्या सर्व चाचण्यांत यशस्वी ठरले असल्याचा दावा कंपनीच्या वतीने करण्यात आला आहे. या रोबोटिक तंत्रज्ञानाच्या साह्याने निर्माता कमीत कमी किमतीत उच्च प्रतीचे कपडे शिवू शकणार असल्याचा विश्वास स्टार्टअपचे संस्थापक जोनाथन जोरनाऊ यांनी व्यक्त केला आहे.
या क्षेत्रामध्ये आतापर्यंत फक्त कपड्याची कटिंग, बटण लावणे आणि खिसा शिवण्यासाठी मशीनचा वापर करण्यात येत होता. मात्र, कपड्याचे वेगवेगळे तुकडे जोडून जीन्स किंवा टी शर्ट बनवण्याचे किंवा शिवण्याचे तंत्रज्ञान अस्तित्वात नव्हते. या कामासाठीही रोबोटिक तंत्रज्ञान आल्यामुळे गारमेंट्स उद्योगात तेजी येण्याची अपेक्षा आहे. या उद्योग क्षेत्रात असलेल्या कंपन्यांना आतापर्यंत येत असलेली कामगारांची अडचण पुढील काळात राहणार नाही.
लाखो लोक बेरोजगार होण्याचे संकट : रोबोटिक तंत्रज्ञान भविष्यात या क्षेत्रात काम करणाऱ्या लाखो लोकांना बेरोजगार बनवू शकते. ऑटोमॅटिक मशीन आल्यास कंबोडिया, व्हिएतनामसारख्या देशांत गारमेंट्स आणि फुटवेअर उद्योगातील ९० टक्के कामगारांवर बेरोजगारूची कुऱ्हाड पडू शकते, असे मत जागतिक कामगार संघटनेच्या एका अंदाजात व्यक्त करण्यात आले आहे. याविषयी प्रश्न विचारल्यावर जोनाथन यांनी सांगितले की, “असे तंत्रज्ञान लोकांवर परिणाम करते हे सत्य आहे. मात्र, असे शोध शेवटी समाजाच्याच उपयोगी येतात.’
दक्षिण अाशियामध्ये ४ कोटी लोकांना रोजगार : भारत, बांगलादेशसह दक्षिण आशियामधील देशांत गारमेंट्स उद्योगात ४.७० कोटी लोक काम करत आहेत, तर असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांची संख्या कोट्यवधीमध्ये आहे. या क्षेत्रात सर्वात जास्त महिला काम करतात.
रोबोटिक हात कपडे कसे शिवतात?
कपडे शिवणारे हे रोबोटिक तंत्रज्ञान थ्रीडी प्रिंटिंगच्या प्रेरणेतून विकसित करण्यात आले असल्याचे जोनाथन यांनी सांगितले. यामध्ये जो कपडा बनवण्यात आला त्यानुसार कॉम्प्युटरमध्ये प्रोग्राम बनवण्यात येतो. म्हणजेच टी शर्ट बनवायचा असल्यास त्याचा प्रोग्राम फीड करण्यात येतो. मशीन कपड्यावर विशेष प्रक्रियेच्या माध्यमातून कपडा कडक बनवते. यामुळे कपड्याची कटिंग करणे सुलभ होते. कापलेल्या कपड्याला मशीनचे रोबोटिक हात शिवणकाम करून जोडतात. शिलाई पूर्ण झाल्यानंतर तयार टी शर्टला मशीन गरम पाण्यात भिजू घालते. त्यामुळे कापड पुन्हा मूळ स्वरूपात येते.
बातम्या आणखी आहेत...