आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jursy Sport Minister Want Going To Bukhrest, But Went Budapest

दिव्य मराठी विशेष: जायचे होते बुखारेस्ट, मंत्री गेले बुडापेस्टला!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुडापेस्ट (हंगेरी) - ‘जाते थे जापान पहुंच गए चीन समझ गए ना...’ असे गाणे ‘चलती का नाम गाडी’ या किशोरकुमारच्या ५७ वर्षांपूर्वी आलेल्या चित्रपटात होते. परंतु काही दिवसांपूर्वीच हे गाणे जर्सीच्या क्रीडामंत्र्याला तंतोतंत लागू झाले. ते जायला निघाले होते एका ठिकाणी अन् पोहोचले मात्र भलत्याच ठिकाणी!

हा किस्सा एखाद्या सर्वसामान्य माणसाविषयी घडला असता तर त्यात फारसे आश्चर्य वाटण्यासारखे काही नव्हते. परंतु दौ-याच्या नियोजनासाठी कर्मचा-यांचा मोठा फौजफाटा असलेल्या मंत्र्याच्याच बाबतीत तो घडला आणि त्यामुळे त्या मंत्र्याची मान लज्जेने खाली झुकली.
लंडन आणि फ्रान्सच्या मध्ये जर्सी हा छोटासा देश आहे. स्टीव्ह प्लॅट हे तेथील क्रीडा उपमंत्री आहेत. पुढील वर्षी होणा-या विश्वचषक नृत्य स्पर्धेचे जर्सीला यजमानपद मिळाले आहे. या वर्षीचे यजमानपद रोमानियाने भूषवले होते. त्यामुळे विश्वचषक नृत्य स्पर्धेचा अधिकृत झेंडा आणण्यासाठी स्टीव्ह यांना रोमानियाची राजधानी बुखारेस्टला जायचे होते, परंतु स्टीव्ह पोहोचले साडेआठशे किलोमीटर अंतरावरील हंगेरीची राजधानी बुडापेस्टला!

स्वत: स्टीव्ह यांनी निवेदन जारी करून ही माहिती दिली आहे. त्यात ते म्हणतात, ‘शुक्रवारी मी जर्सीहून रवाना झालो. पासपोर्टसह सोबत काही वस्तू घेतल्या आणि विमानतळावर पोहोचलो. विमान वेळेवर असल्याचे मला सांगण्यात आले. मग आम्ही गेटवीकमार्गे लंडनच्या हीथ्रो विमानतळावर पोहोचलो. तेथे आम्ही एक रात्र थांबलो. पुढच्या दिवशी दुसरी फ्लाइट पकडली. थोड्या वेळानंतर मला झोप लागली. प्रवास संपायलाच आला होता तेव्हा मी जागा झालो आणि बुखारेस्टला पोहोचायचे असताना मी बुडापेस्टला उतरणार असल्याचे माझ्या लक्षात आले. मित्रांनो, लज्जेने चेहरा लालबुंद होण्यापलीकडे माझ्या हाती काहीच नव्हते. मी तेथून कसाबसा परत आलो.’

खरे तर स्टीव्हची यात काहीच चूक नव्हती. मंत्रालयातील कर्मचा-यानेच चुकीचे तिकीट बुक केले होते. त्यांच्यासोबत गेलेल्या फर्स्ट ऑफिसरलाही कुठे जायचे हे माहीत नव्हते. या प्रवासावर खर्च झालेल्या सरकारी पैशाबद्दल त्यांनी लोकांची माफी मागितली आहे. ते म्हणतात, ‘हे अत्यंत दुर्दैवी आहे. देशातील करदात्यांच्या पैशाची नासाडी झाल्याबद्दल मी माफी मागतो. माझ्या परतीच्या प्रवासावर किती खर्च झाला हे मला माहीत नाही, परंतु जवळपास एक लाख रुपये तरी (१००० पाउंड्स) खर्च झालेच असणार. विभागाने तिकीट बुक करतानाच खबरदारी घ्यायला हवी होती.’

डीडब्ल्यूसी नृत्याचे ऑलिम्पिक
आंतरराष्ट्रीय नृत्य विश्वचषक जगाच्या कानाकोप-यातील विविध रंगी व विविध ढंगी नृत्यांची आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे.या विश्वचषकाला नृत्याचे ऑलिम्पिकही म्हटले जाते. त्यात भारतासह ३८ देशांतील १८००० हून अधिक नर्तक सहभागी होतात. जगातील ही सर्वात मोठी नृत्य स्पर्धा असल्याचा दावा केला जातो.